कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नका, यशोमती ठाकूर यांचे आदेश

राज्यातील कोणीही पीडित महिला न्यायापासून वंचित राहू नये आणि चुकीचे काम करणाऱया कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता कामा नये असे आदेश राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक थांबवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तत्काळ कार्यरत करा असे आदेशही त्यांनी दिले. कामाच्या ठिकाणी होणाऱया महिलांच्या छळाच्या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली व तक्रार निवारण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. विभागनिहाय किती समित्या स्थापन झाल्या याची माहिती घेऊन उर्वरित समित्या दहा दिवसांत स्थापन कराव्यात असे आदेशही यशोमती ठाकूर यांनी दिले. अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करून त्याबाबतच्या माहितीचे फलक सर्व संबंधित कार्यालयांच्या दर्शनी भागात लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

खोटय़ा तक्रारींची शहानिशा

ज्या ठिकाणी खोटय़ा तक्रारी होतील त्याची शहानिशा करून कोणावरही अन्याय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असेही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. प्रधान सचिव आय. ए. कुंदन यावेळी उपस्थित होत्या. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणापासून संरक्षण विभागनिहाय किती समित्या स्थापन झाल्या याची माहिती घेऊन उर्वरित समित्या 10 दिवसांच्या आत स्थापन कराव्यात असे निर्देश देऊन मंत्री ऍड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, विभागीय आयुक्तांनी जातीने लक्ष घालून अधिनस्त सर्व जिल्हाधिकाऱयांकडून याबाबतची कार्यवाही गतीने होईल याची दक्षता घ्यावी. तसेच स्थापन झालेल्या परंतु, कार्यान्वित नसलेल्या समित्या पुनरुज्जीवित कराव्यात. समित्यांच्या अध्यक्षांचे संपर्क क्रमांकासह समित्यांची यादी सचिव कार्यालयाला पाठवावी, असे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या