‘मरे’च्या नव्या एसी लोकलमध्ये चारऐवजी सहा मोटरची शक्ती

573

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गारेगार करणारी वातानुकूलित लोकल अखेर इगतपुरी स्थानकापर्यंत पोहचली आहे. येत्या काही दिवसांत ती कुर्ला कारशेडमध्ये दाखल होणार आहे. ही एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलपेक्षा (उंची 4283 एमएम) 13 मिलिमीटरने बुटकी म्हणजे उंचीने 4270 मिलिमीटर इतकी आहे. विशेष म्हणजे या एसी लोकलची मोटर आणि इतर वीज उपकरणे डब्यांच्या तळाशी खालच्या भागात लावली असल्याने पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलपेक्षा हिची प्रवासी क्षमता नऊ टक्क्यांनी जादा आहे. शिवाय या एसी लोकलला नेहमीच्या चार मोटरऐवजी सहा मोटर असल्याने तिचा वेगही जादा असणार आहे.

चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून मध्य रेल्वेसाठी खास बनवलेल्या एसी लोकलचा प्रवास आता पूर्णत्वास आला असून ती मध्य रेल्वेच्या हद्दीत शुक्रवारी दाखल झाली आहे. खरे तर रेल्वे बोर्डाने पहिली एसी लोकल मध्य रेल्वेसाठीच पाठवली होती. तिच्या कल्याण ते कर्जत परिसरात चाचण्याही झाल्या होत्या. परंतु मध्य रेल्वेच्या दादरपासून सीएसएमटीच्या ब्रिटिशकालीन पुलांच्या अडथळ्यांमुळे तिची जादा उंची अडसर ठरल्याने तिला पश्चिम रेल्वेच्या ताब्यात देण्यात आले होते. पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट तिच्या दिवसभरात 12 फेऱ्या होत आहेत.

कुठे धावणार एसी लोकल?
रेल्वेच्या भौगोलिक रचनेनुसार खास बनवण्यात आलेल्या 4,270 एमएम उंचीच्या बुटक्या एसी लोकलच्या आता काही चाचण्या घेण्यात येणार असून त्यानंतर तिला ट्रान्सहार्बर, हार्बर की मुख्य मार्गावर चालवायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या लोकलच्या चाचण्या घेतल्यानंतर तिला मध्य रेल्वेच्या कोणत्या कॉरिडॉरमध्ये चालवायचे याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या