एसी लोकलचे भाडे चार महिने जैसे थे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकीट दरात कोणतीही वाढ होणार नसून पुढील  चार महिन्यांसाठी सध्याचे दर कायम राहणार आहेत. सध्या प्रथम वर्गाच्या तिकीट दराच्या 1.2 पट भाडे वातानुकूलित लोकलकरिता आकारले जाते.

 गेल्या वर्षी 25 डिसेंबरपासून देशातील पहिली एसी लोकल सुरू झाली. चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतात. पहिली वातानुकूलित सेवा असल्याने भाडय़ामध्ये सवलत देण्यात आली होती.

एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकीट जीएसटीसह 60 रुपये तर कमाल तिकीट 205 रुपये ठेवण्यात आले होते. 25 जून 2018 पासून भाडेवाढ करण्यात येणार होती, परंतु तेव्हा आणखी सहा महिन्यांसाठी दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 25 डिसेंबरपासून त्यात वाढ होण्याची शक्यता होती, परंतु रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा दरवाढीला  चार महिने स्थगिती दिली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत एसी लोकलचे तिकीट दर जैसे थे राहणार आहेत.

जादा थांब्यांमुळे महसुलात वाढ!

1 नोव्हेंबरपासून वातानुकूलित लोकलला मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा अशा सात ठिकाणी अतिरिक्त थांबे दिल्याने 33 लाख 76 हजारांचा जादा महसूल परेला मिळालेला आहे. नोव्हेंबरमध्ये 3500 तिकिटे आणि 47,800 प्रवासी लाभल्याने 19.68 लाख उत्पन्न मिळाले, तर डिसेंबरमध्ये 2700 तिकिटे आणि 34,000 प्रवासी मिळाल्याने 14.08 लाख उत्पन्न मिळाले.  त्यामुळे एकूण 33 लाख 76 हजारांचे उत्पन्न मिळाले.