
पश्चिम रेल्वेने उद्या शनिवार 1 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकात एसी लोकलच्या 31 फेर्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच चर्चगेट ते विरार 48 एसी फेर्या असल्याने एकूण एसी फेर्यांची संख्या 79 इतकी होणार आहे. तर 15 डब्यांच्या 27 नव्या फेर्या चालविण्यात येणार असल्याने 15 डब्यांच्या एकूण फेर्यांची संख्या आता 106 इतकी होणार आहे. 50 फेर्यांचा विस्तार होणार आहे. त्यामुळे एकूण फेर्यांची संख्या 1375 वरून 1383 इतकी होणार आहे.
24 फेर्यांना शॉर्ट टर्मिनेट
1 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर एकूण 79 एसी लोकलच्या फेर्या धावणार असून 39 अप दिशेला तर 40 डाऊन दिशेला चालविण्यात येतील. चार फेर्या रद्द करण्यात येणार असून त्यातील 2 डाऊन तर 2 अप फेर्यांचा समावेश असेल. 50 फेर्यांचा विस्तार होईल त्यात 23 अप, तर 27 डाऊन फेर्यांचा समावेश असेल, तर 24 फेर्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात आले असून त्यात 13 अप, तर 10 डाऊन फेर्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंधरा डबा 106 फेर्या शनिवारीदेखील धावणार
पश्चिम रेल्वेवर नवीन 12 फेर्यांची भर पडणार असून त्यातील 7 अप तर 5 डाऊन दिशेला चालविण्यात येतील. 15 डब्यांच्या 27 नव्या फेर्या चालविण्यात येणार असून एकूण ७९ पंधरा डबा होणार असून सर्वसाधारणपणे त्यातील 30 फेर्या शनिवारी धावत नाहीत, पण नव्या वेळापत्रकातील 106 पंधरा डबा फेर्या शनिवारी देखील धावणार आहेत. तसेच 93 अतिरिक्त 12 डब्यांच्या फेर्यांना 15 डब्यामध्ये परावर्तित करण्यात येणार आहे. पिकअवरमध्ये 595 फेर्यांपैकी 301 फेर्या सकाळच्या पिकअवरमध्ये तर 294 फेर्या सायंकाळच्या पिकअवरमध्ये धावतील असे सूत्रांनी सांगितले.