गंगाखेड रोडवर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

14

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी-गंगाखेड मार्गावर असलेल्या पांडे यांच्या पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वार चालवत असलेली पल्सर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.

परळीतल्या शिवाजी नगर परळी येथील रहिवासी असलेला अशोक व्यकंटी कदम (वय 22 वर्ष) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून परळीकडे येत होता. पांडे पेट्रोल पंपाजवळ तो आला असता समोरून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेने परळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन थर्मलकडे जाणाऱ्या फाट्यावर गतिरोधक बसविण्याची गरज

दरम्यान, नवीन थर्मलच्या परिसरातून होणारी राखेची वाहतूक अनेक अपघातांना कारणीभूत ठरताना दिसून येते. या वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसते. मर्यादेपेक्षा जास्त राख भरल्याने बऱ्याच वेळेला ही राख रस्त्यालगत टाकण्यात येते, याचा त्रास दुचास्वारांना जास्त होतो. शिवाय नवीन थर्मल फाट्याकडून गंगाखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतार असल्याने या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवून गाड्यांची गती कमी करण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या