कमलेश तिवारी हत्येतील आरोपीला नागपुरात अटक

600

हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नागपूरमधील झिंगाबाई टाकळीजवळील माने ले आऊट येथे सैय्यद असीम अली या आरोपीला अटक केली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन न्यायालयात उपस्थित करून ट्रांझिट रिमांड मिळवला.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला कमलेश तिवारीच्या हत्येतील आरोपी नागपुरात असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सैय्यद असीम अलीची चौकशी केली असता हा कमलेश तिवारीच्या हत्येतील इतर आरोपींशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती समोर आली. पथकाने चौकशीअंती सैय्यद असीम अली हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. कमलेश तेवारीच्या हत्येप्रकरणात तो महत्वपूर्ण असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली. त्यावरून आरोपी सैय्यद असीम अली यास दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. आज उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपीला उपस्थित करून ट्रांझिट रिमांड मिळविला.

ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलिस महासंचालक देवेंद्र भारती, जैन नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक अविनाश बारगड, विक्रम देशमाने, गणेश किंद्रे, अनिल लोखंडे यांनी ही कारवाई केली.

दोन्ही मारेकऱयांवर पाच लाखांचे बक्षीस
हिंदू समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणाऱया दोघा मारेकऱयांची माहिती देणाऱयांना पोलिसांनी प्रत्येकी अडीच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तिवारी यांची हत्या केल्यानंतर हे दोघे मारेकरी नेपाळला पळून गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुरतच्या लिंबायत भागात राहणाऱया फरीद ऊर्फ मोईन खान पठाण आणि अशफाक पठाण यांनी सुरतवरून दिवाळीसाठी मिठाई घेऊन आलो आहोत असे सांगत घरात प्रवेश केला. त्यानंतर तिवारी यांची गळा कापला आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी गुजरात एटीएसने मोईनचा भाऊ राशीद, मौलाना मोहसीन शेख आणि फैयाज मेंबरला गुजरातमधून अटक केली. दोघे मारेकरी उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूरमध्ये दिसल्यामुळे पोलिसांनी आज अनेक हॉटेलांवर छापे मारले, मात्र, तिथे हाती काही लागले नाही. कमलेश तिवारी यांची हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली याची माहिती या दोघा प्रमुख आरोपींना पकडल्यानंतर होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या