चेक बाऊन्सप्रकरणी आरोपीला तब्बल नऊ वर्षांनंतर बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कामासाठी उसने घेतलेले पैसे ठकवणाऱ्या एका व्यावसायिकाला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी न्यायालयाने आरोपीला तब्बल नऊ वर्षांनंतर तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. एवढेच नव्हे तर नुकसानभरपाई म्हणून फसवणूक झालेल्या व्यक्तीला नऊ टक्के व्याजासह साडेचार लाख रुपये तीन महिन्यांत परत देण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईत राहणाऱया किशोर गांधी यांचा कार भाडय़ाने देण्याचा व्यवसाय असून निकेश शहा आणि ताराचंद शहा यांनी त्यांच्याकडून व्यवसायासाठी मे 2008 साली सात लाख रुपये घेतले होते. 15 दिवसांत पैसे परत देतो असे सांगून निकेश शहा यांनी गांधी यांना 4 लाख 28 हजार 400 रुपयांचे तीन आगाऊ चेक दिले, परंतु ते तीनही चेक बाऊन्स झाले. याप्रकरणी निकेश शहा यांना नोटीस धाडण्यात आली. त्या नोटीसलाही उत्तर देण्यात आले नाही. याप्रकरणी तक्रारदार किशोर गांधी यांनी न्यायालयात दाद मागितली.

एक्स्प्लनेड कोर्ट रूम नं 28 च्या न्यायदंडाधिकारी सबीना मलिक यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली त्यावेळी अॅड. हेमंत केंजाळकर, अॅड. अर्चना देशपांडे, अॅड मिनल कांबळे यांनी तक्रारदार गांधी यांची बाजू मांडली. त्यावेळी न्यायालयाने केंजाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी निकेश याला याप्रकरणी दोन महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली तर दुसरा आरोपी ताराचंद शहा यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली शिवाय निकेश शहा याला थकवलेले पैसे नऊ टक्के व्याजासह गांधी यांना परत करण्याचे आदेश दिले.

summary- accuse of bouncing cheque case held after nine years