
टेंभुर्णी ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच आरोपींनी हल्ला केल्याची घटना माढा तालुक्यातील चौभे-पिंपरी येथे आज (दि. 3) घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेविषयी व कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी अक्षय भगवान जाधव, अमर भगवान जाधव व सागर भगवान जाधव (रा. जाधव वस्ती, चौभे-पिंपरी, ता. माढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी व उपनिरीक्षक प्रशांत मदने हे पथकासह चौभे-पिंपरी येथे गेले होते. यावेळी तीन सख्ख्या भावांनी संगनमत करून पोलिसांशी हुज्जत घालत झटापट केली. आरोपी अक्षय भगवान जाधव याने उपनिरीक्षक प्रशांत मदने यांना उचलून जमिनीवर आदळले. तर, आरोपी अमर भगवान जाधव याने सहायक निरीक्षक गणेश चौधरी यांना ढकलून दिले. या झटापटीत उपनिरीक्षक मदने यांना मुका मार लागला. तसेच आरोपींनी पोलिसांना धमकावत सरकारी कामात अडथळा आणला. आरोपी अमर जाधव याने घटनास्थळी असलेली लहान मुलांची सायकल उचलून पोलिसांवर फेकली. ही घटना आज (दि. 3) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेप्रकरणी सहायक निरीक्षक गणेश बाबाजी चौधरी (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रोहित डी. पवार तपास करीत आहेत.





























































