
किरकोळ वादातून घर जाळल्याची घटना दहिसरच्या गणपत पाटील नगरात घडली. याप्रकरणी देवराज पाटीलला एमएचबी पोलिसांनी अटक केली. मुख्य सूत्रधार हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दहिसरच्या गणपत पाटील नगर येथे जुली केवट राहतात. 11 मे रोजी त्या कुटुंबीयांसोबत झोपल्या होत्या. साखरझोपेत असताना अचानक घरात धूर आला. आग लागल्याने ते बाहेर आले. आगीत त्यांच्या घरातील साहित्य आणि दुचाकी जळून नष्ट झाली. नेमकी आग कशी लागली हे स्पष्ट होत नव्हते. आगीचे कारण शोधत असताना त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात देवराज पाटील आणि त्याचे तीन साथीदार हे दुचाकीला आग लावत असताना दिसले. याची माहिती त्यांनी एमएचबी पोलिसांना दिली.
एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंद करून देवराजला अटक केली. या परिसरात राहणाऱ्या दोघांविरोधात दहिसर आणि एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहे. मार्च महिन्यात शादाबवर एकाने हल्ला केला होता. तो हल्ला शादाबने एकाच्या मोठय़ा भावाला मारहान आणि अपमानाचा बदला म्हणून केल्याचे बोलले जाते. त्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी एकाला अटक केली. जुली याचा मुलगा लकी हा एकाला न्यायालयात भेटला, त्यामुळे शादाब हा संतापला. लकीला धडा शिकवण्यासाठी शादाबने धमक्या देण्यास सुरुवात केली. त्याने लकीच्या मोटरसायकलवर पेट्रोल ओतून ती पेटवली अशी माहिती तपासात समोर आली आहे.