माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. तीनही आरोपींनी हरयाणात जाऊन बिष्णोई गँगच्या सदस्यांची भेट घेतली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच बाबा सिद्दीकींना मारण्यासाठी आरोपींना तीन लाख रुपयांची सुपारी मिळाली होती असेही पोलिसांनी सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. सिंह याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर कश्पच्या वयाबद्दल संभ्रम असल्याने त्याची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाईल.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत आणखी दोन आरोपींचा समावेश होता. त्यात शिवकुमार गौतम आणि मोहम्मद झिशान अख्तर यांचा समावेश होता. ज्या तीन आरोपींनी सिद्दीकींना गोळ्या घातल्या त्यात गौतमचाही समावेश होता, तो घटनास्थळावरून पळून गेला. सिद्दीकींना मारण्यासाठी अख्तरला सुपारी मिळाली होती असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी आरोपींची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणखी कुणा नेत्याला मारण्याचा प्लॅन तर नव्हता याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कुर्ल्यात एक भाड्याच्या खोलीत राहत होते. या खोलीचे त्यांनी महिन्याला 14 हजार रुपये भाडे दिले होते. चारही आरोपींना या कामासाठी अडीच ते तीन लाख रुपये देण्यात आले होते. हे पैसे चौघांनी आपसांत वाटून घेतले होते.
सिंह, कश्यप आणि गौतम हे हरयाणात गेले होते. त्यांनी हरयाणाच्या तुरुंगात बिष्णोई गँगच्या सदस्यांची भेटही घेतली होती. तिथेच त्यांना सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन आरोपींचा शोध घेण्यासाछी पुणे, हरयाणा आणि उज्जैनला पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.