शौचालय वापराचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅसिड हल्ला, बदलापूर स्थानकातील घटना

शौचालय वापरल्यानंतर पाच रुपये दिले नाहीत या क्षुल्लक कारणावरून शौचालय चालवणाऱ्या ठेकेदाराने 28 वर्षीय प्रवाशाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत प्रवाशाचा डोळा निकामी झाला. विनायक बाविस्कर असे दुर्दैवी प्रवाशाचे नाव आहे. पोलिसांनी ठेकेदार योगेशकुमार चंद्रपाल सिंग (47) याला अटक केली आहे.

विनायक बाविस्कर हे सकाळच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकातील क्रमांक 3 वर असलेल्या शौचालयात गेले. शौचालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी हे शौचालय चालवणारा ठेकेदार योगेश कुमार चंद्रपालसिंग याला पाच रुपये सुट्टे नसल्याचे सांगितले. त्यावरून योगेश कुमार आणि विनायक बाविस्कर यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर योगेश कुमार आणि त्याच्या 15 वर्षीय मुलाने बाविस्कर यांना बेदम मारहाण केली. बाविस्कर यांना  मारहाण करताना बापलेकांनी त्यांच्या  चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅसिड फेकले. या अ‍ॅसिड हल्ल्यात विनायक यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.