अर्जुन डांगळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव; अमृत महोत्सवानिमित्त ‘छावणी’चे प्रकाशन

दलित, सामाजिक आणि राजकीय चळवळीचे नेते, विचारवंत अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘छावणी’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथातून अर्जुन डांगळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावणी’चे प्रकाशन आणि चर्चा या कार्यक्रमाचे शनिवारी अंधेरी येथे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिनकर गांगल, डॉ. मनोहर जाधव, डॉ. प्रज्ञा दया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव होते. ग्रंथाचे संपादक डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, किशोर मेढे व प्रकाशक नितीन कोत्तापल्ले आहेत.  यावेळी सुभाष देसाई म्हणाले, पँथरच्या चळवळीमुळे मला चांगला मित्र मिळाला. पँथरची चळवळ आक्रमक असताना सर्वांना एकत्र ठेवत अर्जुन डांगळे यांनी संयम ठेवला. सामाजिक- शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाजाची प्रगती करण्यासाठी अशा संस्थांना सांभाळून घ्यावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची स्थापना केली. त्यावेळी दलित पँथरचा लोगो शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटला, अशी आठवण सुभाष देसाई यांनी सांगितली. ‘छावणी’ ग्रंथाचा गौरव करताना डॉ. प्रज्ञा दया पवार म्हणाल्या, महाराष्ट्रातील गेल्या 50 वर्षांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घटनांचा इतिहास नोंदवला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात दलित साहित्य व दलित पँथर नावाचे मन्वंतर घडून आले. खरे म्हणजे अर्जुन डांगळे हे आमचे हीरो आहेत.

यावेळी अर्जुन डांगळे यांचा केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव व उपाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डांगळे म्हणाले, मागील पाच वर्षांपासून माझे सत्कार होत आहेत. आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राने सत्कार केला याचा मला वेगळा आनंद वाटतो. हा सत्कार माझा नसून तुम्हा सर्वांचा-जनमानसांचा सत्कार आहे.