परप्रांतीय कामगारांवर कारवाई होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

अमित खोत, मालवण

कालावल खाडीपात्रात तोंडवळी, हडी यासह अन्य ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. वाळू उत्खनन बंदी कालावधी असताना अश्या प्रकारे सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून मालवण महसूल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार समीर घारे यांनी अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कारवाईचा फास अधिकच घट्ट केला आहे.

कालावल खाडीपात्रालगत असलेल्या तोंडावळी, हडी यासह भगवंतगड, वायंगणी, तेरई, मसुरे, बांदिवडे, खोतजूवा या ठिकाणी महसूल प्रशासना बरोबर मालवण व आचरा पोलिसांना तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणी परप्रांतीय कामगार अनाधिकृतरीत्या आढळून आल्यास ते वाळू चोरीच्याच उद्देशाने वास्तव्यास आहेत असे समजून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याबरोबर अनधिकृत झोपड्या दिसून आल्यास त्याही उद्ध्वस्त केल्या जाणार आहेत. तसेच अनधिकृत रित्या वाळू उतरवण्यासाठी रॅम्प उभे केलेले दिसून आल्यास ते उद्ध्वस्त करताना त्या ठिकाणी यापूर्वी ज्यांनी ठेका घेतला आहे त्यांना व जमीन मालकांना नोटिसा बजावून कारवाई केली जाणार आहे. वाळू उत्खननासाठी मोठ्या होड्या वापरल्या जातात. याचा विचार करता यापूर्वी वाळू उपसा ठेकेदारांनी ज्या होड्या वापरल्या त्या सध्य स्थितीत कोठे आहेत ? याची चौकशी करून त्याचीही तपासणी होणार आहे. याबाबत बंदर विभागास आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली.

२० रोजी बैठक घेणार
कालावल खाडी पात्रात विशेष पथक नेमून अनधिकृत वाळू उत्खननावर नजर ठेवली जाणार आहे. तर २० ऑगस्ट रोजी सर्व वाळू व्यावसायिक व ठेकेदार यांची बैठक घेऊन सूचना दिल्या जाणार आहेत. अनधिकृत वाळू उत्खनन व वाळू चोरी पूर्णपणे बंद केली जाणार आहे. असे तहसीलदार घारे यांनी सांगितले.

अडीच लाख ते पाच लाख दंड
कालावल खाडी पात्रात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे याच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त आहेत. त्या नुसार धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. परप्रांतीय कामगारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर वाळू उपसा बोट सापडल्यास पाच लाख दंड व वाळू वाहतूक डंपर सापडल्यास अडीज लाखापेक्षा जास्त दंड. अशी कारवाई केली जाणार आहे.

थेट तहसीदार यांचयाकडे तक्रार करा
अनधिकृत वाळू उत्खनन अथवा वाहतूक दिसून आल्यास किव्वा कोणत्या ठिकाणी सुरू आहे याबाबत माहिती मिळाल्यास थेट तहसीलदार, नायब तहसीलदार यांना फोन करा. असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी जनतेला केले आहे.