देवरुख बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास; कडक कारवाईने नागरिक समाधानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख बाजारपेठेत काही व्यापपार्‍यांनी गटारावर वस्तू विक्रीसाठी ठेवल्याने व बाहेरच फलक ठेवल्याने वाहतुक कोंडी होत होती. यामुळे नागरिकांची व वाहनचालकांची अडचण होत होती. देवरुख नगरपंचायतीने वारंवार सुचना देवूनही यामध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे देवरुख नगरपंचायतीने मंगळवारी देवरुख बाजारपेठेत गाडी फिरवून सूचना दिल्या होत्या. तरीही बुधवारी दुकानाबाहेर वस्तू ठेवण्यात आल्या. देवरुख नगरपंचायतीने बुधवारी सकाळपासूनच दोन गाड्या व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनधिकृतपणे मांडलेला माल जप्त करायला सुरुवात केली. दुकानाबाहेर असलेले रॅक, फलक, भाजीचे ट्रे, मांडण्या उचलून वस्तू जप्त केल्या. काही ठिकाणी कडाप्पा टाकून केलेल्या मांडण्याही उचलण्यात आल्या.

देवरुख नगरपंचायतीची कारवाई सुरु होताच काही व्यापार्‍यांनी आधीच वस्तू उचलून ठेवला. या कारवाईमुळे आता देवरुख बाजारपेठेत रस्ता मोकळा झाला असून देवरुख बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे. आजपासून पुढील 8 दिवस नगरपंचायत प्रशासन यावर लक्ष ठेवणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.