गरीबांना उपचार नाकारले, गर्भवतींना भरमसाठ बिले; मुंब्य्रातील तीन रुग्णालयांवर गुन्हे

989

रुग्णालयात बेडस् शिल्लक असूनही जागा नाही सांगत गरीबांना उपचार नाकरणाऱ्या आणि गर्भवतींना उपचाराच्या नावाखाली भरमसाठ बिले देत लुटणाऱ्या मुंब्य्रातील तीन खासगी रुग्णालयांवर ठाणे महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर व युनिव्हर्सल अशी या रुग्णालयांची नावे असून त्यांच्याविरोधात तक्रारी आल्यानंतर पालिकेने कारवाईचे इंजेक्शन टोचले आहे.

कोरोनाच्या महामारीतही गल्ला भरण्यासाठी खासगी कोविड रुग्णालये रुग्णांना लुटत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर पालिकेने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच बिल आकारण्याची सक्ती केली. मात्र, त्याला बगल देण्यासाठी काही रुग्णालये गरीबांसाठी राखीव असलेले बेडस् रिकाम्या नसल्याचे कारण देत रुग्णांना परत पाठवत आहेत. या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने खास समित्या तयार केल्या असून तक्रारींची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेचे पहिले ‘ऑपरेशन’ शुक्रवारी मुंब्य्रात पार पडले.

  • मुंब्रा प्रभाग समितीमधील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयामध्ये गरीब व आजारी रुग्णांना दाखल करताना, तसेच महिलांना प्रसुतीसाठी दाखल करताना भरमसाठ पैसे भरा असे सांगितले जात होते.
  • रुग्णालयात बेड शिल्लक असतानाही प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दाखल घेत पालिकेने आधी नोटीस बजावली.
  • कारभार न सुधारल्याने अखेर पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशाने या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करत सील ठोकले आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड, लिपिक जितेंद्र साबळे, नैनेश भालेराव यांनी केली.
आपली प्रतिक्रिया द्या