शेतवस्त्यांवर मारहाण करून लुटणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड, नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर व नगर तालुक्यातील शेतातील वस्तीवर जाऊन मारहाण करीत लुटमार करणाऱया आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून साडेअकरा तोळे सोने व एक चारचाकी असा पावणेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळू कांतीलाल काळे (वय 26), विदेश नागदा भोसले (वय 19, दोघे रा. नवापूरवाडी, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), भोईटय़ा ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे (वय 21, रा. मानगल्ली, नेवासा फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. निखिल वाघ (वय 22, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली होती.

निखिल वाघ हे 4 नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसह झोपलेले असताना चार दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांना मारहाण करून 2 लाख 71 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन गेले. त्यानंतर गावातील सचिन जगताप यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून दहा हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काही संशयित इसम चोरीचे सोने विकण्यासाठी संभाजीनगरकडून नगरकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यांच्या सुचनेनुसार पथक नेवाशातील खडका फाटा येथे सापळा लावून थांबलेले असताना त्यांनी संशयित तवेरा गाडी थांबवून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दागिन्यांबाबत चौकशी केली असता, हे दागिने श्रीरामपूर व नगर तालुका परिसरात चोरी केले असून, ते विकण्यासाठी जात असल्याची कबुली त्यांनी दिली. तपासादरम्यान त्यांच्यावर नगर व श्रीरामपूर पोलिसांत 4 गुन्हे दाखल झाल्याचे आढळून आले आहेत.

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे, विठ्ठल पवार, संदीप ढाकणे, विजय भोंबे, मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भीमराज खर्से, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे, विजय धनेधर, रवींद्र घुंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, सारिका दरेकर, उमाकांत गावडे, बबन बेरड या पथकाने ही कारवाई केली.