मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांची शुक्रवारी एफ-उत्तर विभाग कार्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. वेसावे येथील अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चौहान यांच्या जागी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले चक्रपाणी अल्ले यांच्याकडे के-पश्चिमच्या सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अंधेरीतील वेसावे येथील राज्य सरकारच्या अखत्यारीतील सीआरझेड जमिनीवर अनधिकृत बांधकामांवर 3 जूनपासून कारवाई केली जात आहे. या कारवाईत आतापर्यंत आठ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. भूमाफिया व पालिका वॉर्डातील काही अधिकाऱयांच्या हातमिळवणीमुळे ही बांधकामे फोफावली होती. मात्र याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्यावतीने पृथ्वीराज चौहान यांनी कारवाई केली.
अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालणाऱया के-पश्चिम विभागाच्या दोघा कर्मचाऱयांचे या प्रकरणात निलंबनही करण्यात आले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱया कर्मचाऱयांवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी पृथ्वीराज चौहान यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या बदलीवरून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, अशी शंका महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केली.