पुणेकरांना भटकंती भोवली, अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल

1572
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी सुरु असतानाही विनाकारण भटकंती करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी दंडुका उगारला आहे. त्यानुसार अवघ्या पाच दिवसात तब्बल 2 हजार 400 नागरिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामध्ये विनाकारण फिरणार्‍या सर्वाधिक 901 जणांचा समावेश आहे.

अनलॉकनंतर शहरातील विविध भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून हद्दीत कडक कारवाई करीत नागरिकांना दणका देण्यात आला. वाहतूक विभागासह संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण फिरणार्‍याविरुद्ध कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार 3 ते 7 जुलैअखेर वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्यानुसार शहरातील बहुतांश हद्दीत विनाकारण फिरणार्‍या तब्बल 901 जणांवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय विनामास्क 778 नागरिकांसह कारणाशिवाय वाहनांवर प्रवास करणार्‍या 336 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रातही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेषतः किरकोळ व्यवसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांच्याकडून सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे कारवाईवरुन दिसून आले आहे. कोरोनाचा धोका अद्यापही कमी झाला नसल्यामुळे विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पाच दिवसांतल्या कारवाईत पुणेकर कचाट्यात

विनाकारण फिरणे – 901

विनामास्क भटकंती- 778

विनाकारण वाहनप्रवास-336

वाहने जप्त- 262

क्षमतेपेक्षा जास्त सीट प्रवास – 107

वेळेपेक्षा जास्तवेळ दुकाने उघडे – 45

सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणारे दुकानदार – 3

कोरोनाचा धोका टळला नसून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. विनामास्क भटकंती, वेळेपेक्षा जास्तवेळ दुकाने उघडी ठेवणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, ट्रीपलसीट, मोटारीतून अतिरिक्त नागरिकांचा प्रवास करणार्‍याविरुद्ध कारवाई कडक करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टन्सला प्राधान्य देत पोलिसांना सहकार्य करावे. –  बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

आपली प्रतिक्रिया द्या