
मराठी रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिका या क्षेत्रात आपल्या अभिनयाने सलग चार दशके प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (88) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. अण्णा या नावाने ते इंडस्ट्रीत ओळखले जात. अण्णांनी वयाच्या 20व्या वर्षी जोडलेले रंगभूमीशी नातं अखेरपर्यंत निष्ठेने सांभाळले. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतु बर्वा त्यांनी रंगभूमीवर अक्षरशः जिवंत केला. पुलंच्या अंतु बर्व्याने आज एक्झिट घेतली. त्यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवारी ठाणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव गडकरी रंगायतन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयंत सावरकर आजारी होते. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचा मुलगा काwस्तुभ सावरकर यांनी दिली. सावरकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रंगभूमीशी अखेरपर्यंत निष्ठा
जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी नाटपं आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते अभिनय करत होते. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुह्याला माफी नाही’ या मालिकेत ते काम करत होते. ऑगस्टमध्ये ‘तुझं आहे तुझंपाशी’ नाटक या पुनरुज्जिवीत नाटकातून ते रंगभूमीवर काम करणार होते. ‘समांतर’ या वेबसीरिजमध्येही त्यांची लक्षणीय भूमिका होती.
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी मूळ गाव गुहागर येथे झाला. ते गिरगाव येथे आपल्या मोठय़ा भावाकडे पोटापाण्यासाठी आले. त्यांना रंगभूमीची फार आवड होती. आपल्या कारकीर्दीची सुरुवात करताना त्यांनी तब्बल 12 वर्षे बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. ‘किंग लिअर’ हे त्यांचे पहिले नाटक. यामध्ये सावरकर यांनी केलेली विदुषकाची भूमिका चांगलीच गाजली. रंगभूमीवर वावरायचे या एकाच प्रेरणेने ते झपाटले होते. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर जशी संधी मिळेल त्याचा लाभ घ्यायचे ठरवले. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतु बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, तुझे आहे तुजपाशी, ययाति आणि देवयानी, अपराध मीच केला अशा विविधरंगी नाटकांमधून सावरकर यांनी काम केले. सावरकर यांनी 97 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले होते. नाटय़ परिषदेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला. ‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.
1987 मध्ये संगीत ‘संशय कल्लोळ’ या नाटकामध्ये मी काम करत होतो. त्या नाटकासाठी त्यांनी मला खूप मदत केली होती. त्यांच्यामध्ये नकारात्मकता मला कधीच दिसली नाही. ते व्यायाम करून स्वतःला फिट ठेवायचे. मानसिकदृष्टय़ा ते कणखर होते. स्वतःची भूमिका काय आहे? त्याचा अभ्यास कसा करायचा हे शिकवणारी जयंत सावरकर ही आमची युनिव्हर्सिटी होती.
– प्रशांत दामले, अभिनेता
अण्णांनी मला नाटक इंडस्ट्रीत आणले. आम्ही ‘ऊन पाऊस’ नावाची एक एकांकिका केली होती. ती स्पर्धेत पहिली आली होती. त्यानंतर त्यांनी मला साहित्य संघात आणलं. ‘बेबंदशाही’ या नाटकामध्ये त्यांनी मला घेतलं. त्यामध्ये मी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या इतका हरहुन्नरी नट मिळणं कठीण आहे.
– जयंत वाडकर, अभिनेता
मी एकदा अण्णांना म्हणालो, मी एक कार्यक्रम करतोय, त्यात मला ‘एकच प्याला’मधील एक प्रवेश करायचा आहे. मी गडकरींच्या नाटकात कधीच काम केलं नाही. मला ती वाक्यं कशी म्हणायची शिकवाल का? त्यावर अर्थात शिकवीन असं ते आनंदाने म्हणाले. ठाण्यातून दादरला येऊन प्रचंड उत्साहात त्यांनी माझी तालीम घेतली होती. संगीत नाटक ते आताचं आधुनिक नाटक इतक्या मोठय़ा प्रवासाचे तुम्ही साक्षीदार होता. एका तरुणाला लाजवेल अशा ऊर्जेने तुम्ही शेवटपर्यंत कार्यरत होतात. अण्णा, तुमच्या बरोबर मला थोडंफार काम करता आलं हे माझं भाग्य.
– सुबोध भावे, अभिनेता
माझा एव्हरग्रीन हीरो. तिथेही मस्त फिट राहाल याची खात्री आहे. सगळय़ांना आपलंसं कराल… पण मी मात्र इथे खूप खूप मिस करेन तुम्हाला… अण्णा.
– सुकन्या कुलकर्णी, अभिनेत्री
गंगाराम गवाणकर लिखित व विनय आपटे दिग्दर्शित वन रूम किचन ते हर्बेरियममधील मंगेश कदम दिग्दर्शित बाळ कोल्हटकरांचे लहानपण देगा देवा, चंदू कुलकर्णी दिग्दर्शित पुलंचे व्यक्ती आणि वल्ली, अनेक नाटपं, मालिका, सिनेमे आपण केले. खूप वेळ एकत्र घालवला. आजसुद्धा तुम्ही गेलायत हे मलातरी खरे वाटत नाही. मध्यंतरीच्या काळात फार आपली भेट होत नव्हती, तशीच यापुढेही भेट होत नाहीए असेच मी समजेन.
– सुबोध भावे, अभिनेता


























































