जोडीदाराला द्या वेळ!

 >> शब्दांकन – निनाद पाटील

आजच्या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती वेळ आणि ती प्रत्येकाने एकमेकांना दिलीच पाहिजे. मग नाते कोणतेही असो. नवराबायकोनेदेखील एकमेकांसाठी  छान क्वालिटी टाईम म्हणतो ना, तो द्यायला हवा… सांगतोय अभिनेता कश्यप परुळेकर.

माणसामाणसांतली नाती हा फार गमतीशीर आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे असे मला वाटते आणि ते नाते जेव्हा नवराबायकोचे असते तेव्हा… वाचून विचारत पडलात ना? सांगतो मी तुम्हाला सविस्तर, मला नेमके काय म्हणायचे आहे ते!
माझे नुकतेच लग्न झाले होते. त्यादरम्यान मी एक सिनेमा करत होतो. ‘कॉफी’ नाव सिनेमाचे. मी त्या चित्रपटात रणजित राजवाडे ही भूमिका साकारत होतो. त्या भूमिकेला खूप छान शेड्स होत्या. संवादही खूप छान लिहिले गेले होते आणि तो एक छान जुळून आलेला, जमून आलेला चित्रपट होता… ‘कॉफी!’
थोडक्यात गोष्ट सांगायची तर या चित्रपटातील माझी बायको दुसऱया एका पुरुषाच्या प्रेमात पडते. त्याच्याकडे ओढली जाते आणि ती रणजितकडे येऊन ताङ्ग मानेने त्याला सांगते, ‘‘मी दुसऱया पुरुषाकडे ओढली गेली आहे, प्रेमात पडली आहे. त्याचं आणि त्याचं कारण तू स्वतः आहेस रणजित.’’ हे ऐकल्यावर रणजित विचारात पडतो. क्षणभर त्याला कळत नाही की, तो ऐकतो आहे ते खरे आहे की खोटे आणि बायकोशी बोलता बोलता त्याला सारे उलगडत जाते, किंबहुना उमगत जाते. ती बरेच काही बोलून जाते, बोलत राहते…इतकी वर्षे लग्नाला झाल्यानंतरसुद्धा तुला माझे मन कळले नाही. तुला वेळच नसतो रे! दिवसांमागून दिवस गेले, महिन्यांमागून महिने तू मला गृहीत धरायला लागला आहेस!
हा चित्रपट करताना, किंबहुना रणजित ही भूमिका साकारताना मला एक नवा ‘कश्यप’ सापडत गेला. या भूमिकेविषयी मी माझ्या बायकोशीसुद्धा बोललो, अगदी सविस्तरपणे. आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने काही ना काही तरी दान मला निश्चित दिलंय, पण रणजित राजवाडे याने जे दिलेय ते मी कधीही विसरू शकणार नाही.
ढोबळमानाने लग्नाचे वय झाले की, सामाजिक दबाव, घरच्यांचा आग्रह म्हणून किंवा लग्न करायचे आहे म्हणून लग्न करायचे, असा एक ढोबळमानाने विचार बहुतेकांचा असू शकतो, पण त्या पलीकडे जाऊन ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य काढायचे आहे, त्या जोडीदारासोबत आपले मन जुळलंय का? विचार जुळलेत का? आवडीनिवडी जुळत आहेत का? जोडीदाराला एक माणूस म्हणून आपल्या आयुष्यात आपण स्वीकारले आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासोबत आपला संवाद होतोय का आणि तो सुरू राहतोय का? सातत्य असणे हे फार महत्त्वाचे.
आज इतकी वर्षे लग्नाला झाली तरी, कितीही दमलो असलो शूटिंगवरून तरीही न थकता आम्ही दररोज छान मस्तपैकी गप्पा मारतो. बरे, गप्पांना विषयाचे बंधन नसते. मग शूटिंगमध्ये काय झाले, दिवसभरामध्ये काय केले किंवा ड्रायव्हिंग ट्रफिक, आलेला मित्राचा पह्न इथपासून मी सुरू केलेला संवाद… बायकोने त्याला दिलेली प्रतिक्रिया, मत, कामवाली आली नाही, घरातले पाहुणे, पह्न, इकडचे तिकडचे काहीही, मुलींनी केलेली मस्ती, तिचे हट्ट… कुङ्गल्याही विषयावर गप्पा मारतो आम्ही! आजच्या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती वेळ आणि ती प्रत्येकाने एकमेकांना दिलीच पाहिजे. मग नाते कोणतेही असो. नवराबायकोनेदेखील एकमेकांसाठी  छान क्वालिटी टाईम म्हणतो ना, तो द्यायला हवा आणि त्यामुळेच तर नाते अलवारपणे उमलत जाते. हो ना!