सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी स्थानिकांनी या पुतळ्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. दरम्यान, अवघ्या 8 महिन्यांतच महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर शिवप्रेमीकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कलाकारांनी देखील यावर रोष व्यक्त केला असून महाराजांची माफी मागितली आहे.
अभिनेता रितेश देशमुख याने या घटनेवरून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र यावेळी रितेशने केवळ तीन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजे माफ करा असे रितेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला समर्थन दिले असून आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.
राजे माफ करा 🙏🏽#छत्रपति_शिवाजी_महाराज
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 26, 2024
शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याच्या अशा अवस्थेमुळे समस्त शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवछत्रपतींचा आशीर्वाद अशा घोषणा देत भाजपनं पहिल्या सत्तेच्या काळात चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्यांच्या खोट्या शिवप्रेमाचा बुरखा फाटला असल्याच्या भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.