ठाण्यात भरवस्तीत कुंटणखाना चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक; अन्य दोघींची सुटका

भरवस्तीमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. काशिमीरा परिसरातील एका मॉलजवळ छापा टाकून या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला असून अनुष्का मोहन दास (४१) असे अभिनेत्रीचे नाव आहे. तिच्या दोन अन्य साथीदार अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. बंगाली टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका या अभिनेत्री करीत होत्या. ठाण्यातील या उच्चभ्रू वेश्याव्यवसायामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठाण्यात एक अभिनेत्री वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खबर पोलिसांना लागताच त्यांनी दोन बनावट गिऱ्हाईक तयार केले. त्यांनी बंगाली अभिनेत्री अनुष्का मोहन दास यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तिने दोघांनाही काशिमीरा येथील एका मॉलजवळ भेटायला बोलावले. या बनावट ग्राहकांकडून पैसे स्वीकारताना अनुष्का हिला पोलिसांनी सापळा रचून पकडले. अन्य दोन अभिनेत्रींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांनी दिली.

वसईत चाकूचे वार करणारी टोळी जेरबंद
वसईच्या आचोळे गावात पायी जाणाऱ्या धनंजय यादव या तरुणावर मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी चाकूचे वार करीत मोबाईल व पैसे लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चौघांना अटक केली आहे. त्यातील एकजण अल्पवयीन आहे. अरगान शेख, राज उपाध्याय व अन्य एक अशा टोळीने हा हल्ला केला होता.