वडिलांच्या निधनानंतरही अभिनेत्री अश्विनी महांगडे करतेय शेतात काम

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावर काही दिवसांपूर्वीच दु:खाचा डोंगर कोसळला. तिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र ‘जगणं सोडता येत नाही अन् लढणं थांबवता येत नाही’ असं म्हणत अश्विनीने आपले दु:ख बाजूला सारत शेतकामाला सुरुवात केली आहे. याद्वारे अनोख्या पद्धतीने तिने आपल्या शेतकरी वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘शेतकऱयाची लेक’ असे हॅशटॅग वापरत अश्विनीने शेतात काम करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये तिने म्हटलंय, ‘‘काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात. त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईमूग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नानांसोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे, हीच नानांची प्रेरणा व शिकवण. सध्या शेतात गळून पडलेल्या शेंगा वेचणे सुरू आहे, गवत बांधावर टाकतोय. पावसाच्या आधी शेत तयार करायचे आहे,’’ असेही तिने म्हटले आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत असून अनेकांनी तिचे काैतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या