घरूनच ऑडिशन देऊन मिळाला इंदौरी इश्क, मीरा जोशीने सांगितला वेब सिरीजचा अनुभव

छोटय़ा पडद्यावर खलनायिकेची भूमिका रंगवल्यानंतर अभिनेत्री मीरा जोशी आता हिंदी वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. आजपासून ‘एमएक्स प्लेयर’वर भेटीला येणाऱया ‘इंदौरी इश्क’ या केब सिरीजमध्ये ती ‘सिंपल गर्ल’च्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्काचं म्हणजे लॉकडाऊन दरम्यान घरातूनच ऑडिशन देऊन तिची या भूमिकेसाठी निवड झाली आहे.

समीत कक्कड दिग्दर्शित ही नऊ भागांची वेब सिरीज लेखक कुणाल मराठे यांच्या ‘थर्की’ या पुस्तकावर आधारित आहे. भूमिकेसाठी निकड कशी झाली याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना मीरा म्हणाली, ‘‘गेल्या लॉकडाऊन दरम्यान कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांचा मला फोन आला. आलियाच्या भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं. ही सिंपल मुलीची भूमिका असल्याने सुरुवातीला मलाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण आजवर मराठीत मला खलनायिकेच्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. माझा चेहरा बघून कुणालाच दया येत नाही (हसत) अशा प्रतिक्रिया मला प्रॉडक्शन हाऊसकडून मिळाल्या आहेत. त्यामुळे वेगळी भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल रोहन मापुस्कर, समीत कक्कड यांचे मनापासून आभार.’’

भूमिकेबाबत ती म्हणाली, ‘‘आलिया ही प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार न करता प्रेमात रमणारी मुलगी आहे. तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर टिपिकल बाबू, शोना झोनमधली ती मुलगी आहे. ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात कुणालची (रित्किक साहोरी) एंट्री होते. पुढे तिचं आयुष्य तिला कोणत्या वळणावर नेऊन ठेवतं, त्यांचं नातं पुढे टिकेल का, हे तुम्हाला केब सिरीजमधून पाहायला मिळेल.’’

नो मेकअप लूक!

आलिया ही सर्वसामान्य तरुणी आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. लूकच्या बाबतीत सांगायचे तर माझा ओरिजनल लूक यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अगदी माझी हेअरस्टाईलदेखील ऑफक्रीन असते तशीच इंदौरी इश्कमध्ये आहे, असे मीराने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या