रवीना टंडन वादाच्या भोवऱ्यात

मद्यधुंद अवस्थेत महिलेला मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्री रवीना टंडन वादाच्या भोवऱयात अडकली आहे. रवीनाने शनिवारी रात्री दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे.

वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ रवीनाच्या कारने एक महिलेला जखमी केल्याचा दावा करण्यात आलाय. त्यानंतर रवीनाचा ड्रायव्हर कारमधून बाहेर आला आणि महिलेच्या कुटुंबीयांशी वाद घालू लागला. वादानंतर चालकाने हाणामारी सुरू केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. यानंतर रवीनाही गाडीतून खाली उतरली आणि त्यांच्याशी भांडू लागली.

रवीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये रवीनाला पीडितेचे कुटुंब आणि स्थानिक जमावाने घेरले आहे. पोलिसांना बोलवा असे लोक बोलत आहेत. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबातील एक महिला म्हणते- तुला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे.’ रवीना जमावाला सांगत होती -‘कृपया मला धक्का देऊ नका… मला मारू नका… व्हिडीओ शूट करू नका’ अशी विनंती करताना रवीना व्हिडीओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेनंतर रवीना टंडन काही वेळातच तेथून निघून गेली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने खार पोलीस ठाणे गाठले. रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांनीही पोलीस स्टेशन गाठले.