तो माझा आरसा आहे!

460

समिधा गुरू – अभिजित गुरू

मधुचंद्र म्हणजे – मधुचंद्र म्हणजे आपले जे काही नाते आहे ते आणखी घट्ट होण्याचा सुंदर काळ.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – फिरायला आम्ही गोव्याला गेलो होतो आणि त्या सगळ्याचे प्लॅनिंग अभिजितनेच केले होते. पहिल्यांदाच विमानात बसणार होते. ते माझ्यासाठी त्याच्याकडून सरप्राईज होते.

तिथे आवडलेले ठिकाण? – गोवा खरंच खूप आवडले आणि मंगेशीचं मंदिर असो, तिथला समुद्रकिनारा, तिथली संस्कृती, हे सगळं मला पाहायला मिळाले होते. त्यात मी नागपूरची असल्याने माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. माझ्यासाठी फ्रेश वातावरण अनुभवायला मिळालं.

ठिकाणाचे वर्णन – सुशेगादच म्हणेन. कारण तिथे गेल्यावर नक्कीच चिंता नाही, ताण-तणाव नाही, जबाबदाऱयांची जाणीव नाही असे वाटते. इतका निवांत आणि तेवढेच प्रेमळ गोवा वाटतों. खूप निसर्गसौंदर्य वाटतं.

तिथे केलेली शॉपिंग – वेस्टर्न कपडय़ांची शॉपिंग केली होती.

मधुचंद्र हवाच की… – हे सांगणं कठीण आहे. पण एकमेकांसोबतचा निवांत क्षण नक्कीच हवा. मग त्याला तुम्ही मधुचंद्र म्हणा किंवा अन्य काही. जेवढा पहिला मधुचंद्र असतो तेवढाच एका काळानंतर, ठरावीक वेळेनंतर वयानंतर आलेला दुसरा मधुचंद्रसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.

एकमेकांशी नव्याने ओळख – माझ्यासाठी खूपच छान होती. कारण एक तर मी आणि अभिजित जेवढे घट्ट मित्र होतो तेवढेच एकत्र स्टेजवर आम्ही कामही करत होतो. त्याच्यामुळे क्रिएटिव्ह, भावनिक पातळीवर तो खूपच माझ्याशी मित्रत्वाच्या लेव्हलला होता. एक नवरा म्हणून जेव्हा जबाबदाऱया त्याच्यावर आल्या किंवा माझ्यावर आल्या. त्यात कोणाची मदत न घेता मुंबईमध्ये एकटा संसार करताना आम्ही एकमेकांचा आदर करायला शिकलो. तो आदर, ती मैत्री लग्नानंतर जास्त दृढ झाली. आतापर्यंत जे तुझं-माझं होतं ते आपलेपणावर आलं. ते जास्त मजेशीर होतं.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – हे प्रत्येकावर अवलंबून आहे. अभिजित माझा चौथीपासूनचा मित्र आहे. कधी कधी एखाद्याला ओळखायला पूर्ण आयुष्य कमी पडतं. मी आणि अभिजित आता इतकं एकमेकांना ओळखतो की माहीत आहे कोणत्या गोष्टीवर नेमकी काय प्रतिक्रिया येईल. कुठे तरी तुमचा एकमेकांवरचा विश्वास, कुठे तरी असलेले कनेक्शन होणं महत्त्वाचं असतं. दोघांमध्ये असलेला संवाद, कनेक्शन आणि विश्वास या तीन गोष्टी दोघांमध्ये असेल तर वेळ हा फॅक्टर मागे पडू शकतो. अगदी दोन दिवसांत पण एखाद्याला चांगलं ओळखू शकतो.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – त्य़ावेळेला मी मांसाहार करत नव्हते. गोव्यात मी पहिल्यांदा सुरमई खाल्ली होती. ती आवडली आणि मी खायला सुरुवात केली.

अनोळखी ठिकाण की रोमॅण्टिसिझम – वेळ. माझ्यासाठी आताची एकंदरित परिस्थिती पाहता जेवढे व्यस्त असतो. त्यामुळे एकत्र बसून बेडरूममध्ये घालवलेला वेळही रोमॅण्टिक वाटतो. नक्कीच सोबत तुमची चांगली असायला हवी आणि मला वाटतं अभिजित रोमॅण्टिकपेक्षा क्रिएटिव्ह जास्त आहे. आम्ही रोमॅण्टिक ठिकाणी गेलो तरी आमच्या गप्पा फिल्म, पुस्तक या विषयांवर होतात. त्यामुळे ठिकाण कुठलंही असो, अभिजितसोबतची कंपनी मला आवडते. त्याच्यासोबत कुठेही वेळ घालवू शकते.

जोडीदाराची खास आठवण? – हनीमूनला गेल्यावर तिथे मला भरपूर ताप आला होता. त्यानंतर त्याने मार्केटमध्ये जाऊन औषध आणलं. तो मला बोलला, शेवटी हनीमूनला येऊनसुद्धा तू औषध आणायला लावलेस. लोक गोव्यात येऊन वाईन आणतात आणि मी औषध आणलं. पण त्याने त्यावेळी घेतलेली काळजी मी कधीच विसरू शकत नाही.

एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू – मी त्याच्यासाठी ग्लेअर्स घेतले होत आणि त्याने माझ्यासाठी ब्रेसलेट घेतले होते. माझ्याकडे अजून ते आहे.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – तो माझा बेस्ट फ्रेण्ड आहे, माझा डायरेक्टर आणि गुरूही तोच आहे. प्रचंड उत्साही आहे. आमच्या नात्यात समजूतदारपणा आहे. कारण आमच्यात चांगली मैत्री आहे. आम्ही आधीच ठरवलं होतं की, नवरा-बायको असा संसार नाही करायचा. आपण मित्र-मैत्रीण आहोत आणि आयुष्यभर ती मैत्री जपूया. ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच हनीमूनपासून आमच्यात रुजले गेले. माझा तो एकमेव मित्र आहे, त्याची मी एकमेव मैत्रीण आहे. त्यामुळे संसार करतानासुद्धा कुठलेही क्षण असतील, 131 रुपयांत आठ दिवस काढायचे असतील, नवीन गाडी, घर घ्यायची असेल, ते तेवढय़ाच आनंदाने आम्ही एकत्र अनुभवले आहे. त्याने पाळलेला प्रत्येक शब्द, असे छोटे -छोटे क्षण एकत्र घालवले आणि घर तयार केले. मला असं वाटतं, तो माझा मित्र जास्त आहे. आपण एखाद्या माणसासमोर आरशासारखं उभे राहतो तसे अभिजित माझा आरसा आहे. दोघं भांडतो, कुठल्याही विषयावर बोलू शकतो, नवरा-बायकोसारखं वागू शकतो. चांगलं-वाईट मित्र म्हणून कळतं. मी जर बोलायला लागली असेल तर अभिजितमुळे. करीअरचा कॉन्फिडन्स त्यानेच दिला. करीअर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टमध्ये त्याचा मोठा वाटा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या