गोडाची शौकीन

>> मृदा झरेकर, डहाणूकर कॉलेज

खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असतात. रोजच्या धावपळीत या आवडीनिवडी जपण्याचा आपण प्रयत्न करतो. कुणाला चटकदार पाणीपुरी आवडते तर कुणाला घरचं जेवण.  पडद्यावर आपले मनोरंजन करणाऱया कलाकारांना कोणती डिश आवडते, ही मंडळी डाएट सांभाळून जिभेचे चोचले कसे पुरवतात, हे जाणून घ्यायची आपली इच्छा असते. ‘चटकदार चंदेरी’मध्ये सेलिब्रेटींच्या खाद्य सवयी आपण जाणून घेणार आहोत. आजची सेलिब्रिटी आहे तेजश्री जाधव.

अभिनेत्री तेजश्री जाधव गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या अकिरा चित्रपटाद्वारे तेजश्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होती. तेजश्रीला मुळात खाण्याची खूप आवड आहे. खास करून गोड पदार्थ.  लहानपणापासून तिला गोड पदार्थ खूप आवडतात. गुलाबजाम, जिलेबी, गव्हाचा हलवा तर तिच्या आवडत्या डिशेश.  नवरात्रीत कुमारी पूजनाला लहान मुलींना बोलवायचे, तेव्हा तेजश्रीही जायची. तिला तिथे जायला आवडायचे कारण तिला तिथे खीर किंवा गव्हाचा हलवा खायला मिळायचा. ती गोड पदार्थाची इतकी शौकिन आहे की,  ती पाणीपुरी सुद्धा मिठ्ठावालीच खाते.

तेजश्री चहा खूप उत्तम बनवते. घरात तिच्या चहाची सर्वाधिक स्तुती केली जाते. तिचा लहान भाऊ तर ती बनवल्याशिवाय चहाही पीत नाही. तिला तिच्या आईच्या हातच जेवण फार आवडतं. आईच्या हातचा पनीर चिली हा पदार्थ तिला खूप आवडतो.

अभिनय क्षेत्रच असं आहे की शूटींगनिमित्ताने सतत फिरतीवर असावे लागते. अशावेळी घरचं जेवण फारसं लाभत नाही. तेजश्रीला मात्र घरचं जेवण आवडतं. कामावरून आल्यावर रात्री जर फक्त वरण-भात जरी मिळालं तरी ती खूप खुश होऊन जाते. आईच्या मायाने वाढलेली प्रत्येक गोष्ट खूप आनंदमय असते. पौष्टिक आहार सांभाळण्यासाठी तिला रोज अंडी खावे लागतात.  चपाती ही तिच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. अशाप्रकारे आहाराची व तब्येतीची काळजी घेत तेजश्री आपलं डाएट सांभाळते.