हिंडनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यावर आरोप करण्यात आले. अदानी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये माधबी पुरी बूच यांनी गुंतवणूक केल्याचा आरोप हिंडनबर्गने केला. या आरोपानंतर अदानींचे शेअर्स आज बाजार उघडताच धडामकन कोसळले. जवळपास 7 टक्क्यांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 53 हजार कोटींचे तर अदानींचे 1.28 लाख कोटींचे नुकसान झाले. सोमवार हा गुंतवणूकदार आणि अदानींसाठी ब्लॅक मंडे ठरला.
अदानींच्या 10 कंपन्यांच्या शेअर्सचे एकत्रित बाजार भांडवल 16.7 लाख कोटींवर घसरले आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास बाजार उघडताच अदानींचे सर्व शेअर्स कोसळले. अदानी एनर्जी सोल्युशन्सने बीएसईवर सुमारे 17 टक्क्यांच्या घसरणीसह सुरुवात केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास बीएसईवर हा शेअर 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 1,075.45 रुपयांवर व्यवहार करत होता. हिंडनबर्गच्या आरोपांचा सेन्सेक्स आणि निफ्टीलाही फटका बसला. सेन्सेक्स 300 अकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 100 हून अधिक अंकांनी कोसळला. निफ्टीतील टॉप लूजर्सपैकी अदानी एन्टरप्रायझेस शेअर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास 3.41 टक्क्यांनी घसरून 3079 रुपयांवर आला.
हिंडनबर्गच्या ताज्या अहवालात काय?
कामकाज सुरू ठेवल्यास त्यात कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही असा अदानींना आत्मविश्वास होता. तो सर्वात आधी आमच्या लक्षात आला. माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती. याबद्दल आम्हाला माहित नव्हते. या हिस्सेदारीचा वापर गौतम अदानी यांचे मोठे बंधु आणि व्यापारी विनोद अदानींनी केला होता. आम्ही अदानींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल 18 महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात सेबीने आश्चर्यकारकरित्या निरुस्ताह दाखवला होता, असे आरोप हिंडनबर्गने ताज्या अहवालात केले आहेत.
मोदी आपल्या मित्राला वाचवण्यात व्यस्त– काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मित्र अदानी महाघोटाळा करत आहे. देशाला लुटत आहे. हे सर्व माहित असूनही मोदी मूग गिळून गप्प आहेत. तपासाच्या नावाखाली देशाची दिशाभूल करत आहेत. देश आणि जनतेसोबत विश्वासघात करत आहेत. जनतेचे पैसे बुडोत किंवा देश उद्ध्वस्त होऊ देत. मोदींना त्याची कसलीही फीकीर नाही. ते केवळ आपल्या मित्राला वाचवण्यात व्यस्त आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने एक्सवरून मोदींवर जोरदार घणाघात केला आहे.
24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्गने अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि ऑडिटिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. तसेच हा कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले होते. अदानी समूहातील अदानी एन्टरप्रायझेस कंपनी किरकोळ विक्रीसाठी 20 हजार कोटी रुपयांचे समभाग जारी करणार असताना हिंडनबर्गने हा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांच्या समभागांमध्ये अक्षरशः भूकंप झाला होता. दरम्यान, त्यानंतर त्यांना सेबीने क्लीन चिट दिली होती.
कोणते शेअर्स किती घसरले
अदानी एंटरप्रायजेस- 3.55 टक्के
अदानी पोर्टस् अँड एसईजेड- 4.80 टक्के
अदानी ग्रीन एनर्जी-4.47 टक्के
अदानी एनर्जी सोल्यूशन्स- 41.6 टक्के
अदानी टोटल गॅस- 7.22 टक्के
अदानी विल्मर- 4.72 टक्के