नगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान

कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव बऱयाच अंशी घटल्याने या निवडणुका जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 21 रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेची अंतिम मतदारयादी 7 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आहेर यांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी पुढील पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मृत आणि नवीन संस्था सभासदांच्या ठरावासाठी 18 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानंतर 19 जानेवारीपासून बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 19 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता अर्जांची छाननी होणार असून, 28 जानेवारी ते 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता चिन्हवाटप करण्यात येणारअसून, 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

दरम्यान, जिल्हा बँक गेल्या अनेक वर्षांपासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आहे. खासदार सुजय विखे यांनी आजच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षपातळीवर निर्णय घेतला जाईल. जे बरोबर येतील, त्यांना घेऊन जाऊ, असे वक्तव्य केल्याने यंदाची निवडणूक गाजण्याची चिन्हे आहेत

आपली प्रतिक्रिया द्या