
मुंबई तील अतिरिक्त शिक्षकांवर मुंबई बाहेर समायोजनाची सक्ती नाही. पालघर, रायगड जिह्यातील शाळेत नेमणूक झालेल्या मुंबई तील अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत परत येण्याचा पर्याय शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिला आहे.
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्या दालनात मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षण सचिव , उपसचिव , शिक्षण संचालक, सहसंचालक, मुंबई विभाग उपसंचालक, मुंबई विभागातील सर्व शिक्षण निरीक्षक, पालघर, रायगड, ठाणे येथील शिक्षण अधिकारी उपस्थित होते. मुंबईत ८५० आणि मुंबई विभागात १०३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. स्वच्छेने मुंबई विभागाबाहेरील शाळेत जाऊ इच्छीणार्या शिक्षकांसमोर पर्याय खुला करण्यात आला आहे.
पगार बंद होणार नाही
मुंबई विभागात रिक्त जागा व वाढीव पदे यांची संख्या फक्त २३५ पर्यंत आहेत.त्यामुळे सर्वांचे समायोजन लगेचच होणार नाहीत परंतु जशी जशी पदे रिक्त होतील तसे रिक्त जागांवर समायोजन होईल परंतु कोणाचाही पगार बंद होणार नाही अशी सूचना यावेळी शिक्षण मंञ्यांनी केली.
अतिरिक्त शिक्षकांना निवडणुकीची कामे शाळेच्या वेळेतच
अतिरिक्त शिक्षक सध्या निवडणुकीची कामे करत आहेत परंतु त्यांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत, ही बाब शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणमंत्र्यांनी लगेचच अतिरिक्त शिक्षकांच्या कामाची वेळ ही शाळेच्याच कामांच्या तासांएवढी असावी याविषयी निवडणूक आयोगाला काही पत्र पाठवता येते का अशी सूचना केली.



























































