
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांनाही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावरील रहदारीचे नियम पाळणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट मत व्यक्त न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने एका रस्ते अपघात प्रकरणातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी नुकसानभरपाईत वाढ केली. परदेशात नियम पाळणारे हिंदुस्थानी नागरिक मायदेशात नियम का पाळत नाहीत? रस्ता ओलांडताना सिग्नलचे नियम पाळणे अनिवार्य आहे, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
ठाणे महापालिका परिवहन बसच्या (टीएमटी) अपघातात सतीश जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रक्कमेत उच्च न्यायालयाने 1.92 लाख रुपयांची वाढ केली. 9 नोव्हेंबर 2012 रोजी ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ रस्ता ओलांडताना सतीश जोशी यांना टीएमटी बसने धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा 16 मार्च 2013 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने जोशी यांच्या कुटुंबियांना 13.23 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली होती.
भरपाईची रक्कम अपुरी असल्याचा दावा करीत जोशी यांच्या पत्नी आणि मुलीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निर्णय दिला. न्यायालयाने मृत सतिश जोशी यांचे मासिक उत्पन्न 8,000 रुपयांऐवजी 10,000 रुपये गृहीत धरले. तसेच जोशी यांच्या कुटुंबीयांना सहन कराव्या लागलेल्या मानसिक त्रासाबद्दल 50 हजार रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर केली. त्यानुसार रक्कमेत वाढ करुन न्यायालयाने जोशी यांच्या कुटुंबियांसाठी एकूण नुकसानभरपाई 15,15,000 रुपये आणि त्यावर व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. याचवेळी न्यायालयाने नागरिकांच्या सामाजिक जबाबदारीवरही बोट ठेवले. परदेशात नियम पाळणारे हिंदुस्थानी नागरिक मायदेशात का पाळत नाहीत? रस्ता ओलांडताना सिग्नलचे नियम पाळणे अनिवार्य आहे. मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी नियम तोडले, तर मुलेही तेच शिकतील. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी शिस्त पाळली पाहिजे, असेही न्यायालयाने सुचवले आहे.



























































