
महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिचा सलग दुसऱया दिवशी सातव्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत डंका बघायला मिळाला. तिने सुवर्णपदकांच्या हॅटट्रिकसह स्पर्धेत पाच पदके जिंकण्याचा पराक्रम केला. जलतरणात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशी पदकांची ‘अष्टमी’ साजरी केली.
गया शहरातील ‘बीआयपीएआरडी’च्या जलतरणात तलावाच्या परिसरात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. 400 मीटर फ्री स्टाइल व 100 मीटर बटरफ्लाय आणि रिले प्रकारात मुंबईच्या अदितीने तीन सुवर्णपदके जिंकून आपली हुकूमत गाजवली. रिले संघाने सुवर्ण, समृद्धी जाधव व अथर्वराज पाटील यांनी रौप्य, अर्णव कडू, श्लोक खोपडे व झारा बक्षी यांनी कांस्यपदकांची कमाई करून दिवस गाजविला.
अदिती हेगडेने 400 मीटर फ्री स्टाइल शर्यत 4.32.87 वेळेत पूर्ण करीत ‘सुवर्ण’कामगिरी केली. दिल्लीच्या तितिक्षा रावत हिला रौप्य, तर कर्नाटकच्या श्रीचरणीला कांस्यपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे 100 मीटर बटरफ्लाय प्रकारातही अव्वल स्थान गाठून अदितीने बाजी मारली. सुरुवातीपासून आघाडी घेत 1.04.73 वेळेत शर्यत जिंकून स्पर्धेतील चौथ्या पदकावर तिने शिक्कामोर्तब केले. गत तामीळनाडू स्पर्धेतही पदकांचा ‘चौकार’ झळकविण्याचा करिश्मा तिने घडविला होता. कर्नाटकची सुहासिनी घोष हिने रौप्यपदक जिंकले, तर महाराष्ट्राची झारा बॉक्षी कांस्यपदकाची मानकरी ठरली.
मुलींच्या 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या समृद्धी जाधव हिने दोन मिनिटे 49.21 सेपंद वेळेसह रौप्यपदक जिंकले. तामीळनाडूच्या श्रीनिथी नाटेसन हिने दोन मिनिटे 44.41 सेपंद वेळ नोंदवीत सुवर्णपदकावर कब्जा केला, तर बंगालच्या पृथा देबनाथ हिला दोन मिनिटे 49.95 सेकंद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या दीड हजार मीटर फ्री स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या अथर्वराज पाटीलला 16 मिनिटे 38.36 सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळाले. आंध्र प्रदेशच्या गोट्टिटी यादवने 16 मिनिटे 30.57 सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर छत्तीसगडच्या पार्थ श्रीवास्तवला 16 मिनिटे 52.69 सेपंद वेळेसह कांस्यपदक मिळाले.
मुलांच्या 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात श्लोक खोपडे याने दोन मिनिटे 25.53 सेनद वेळ नोंदवीत महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. कर्नाटकच्या सूर्या झोयप्पा याने दोन मिनिटे 24.55 सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली,
मुलींच्या फ्री स्टाइल रिलेत सुवर्ण
अदिती हेगडे, सारा बक्षी, श्रीलेखा पारिख व अल्फेया धनसुरा या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने जलतरण विभागातील 4 बाय 100 मीटर फ्री स्टाइल रिले चार मिनिटे 01.91 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. कर्नाटकच्या संघाला चार मिनिटे 02.47 सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर तामीळनाडूला चार मिनिटे 09.64 सेकंद वेळेसह कांस्यपदक मिळाले.