
सर्वांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे ठरणारे आणि मंजुरीसाठी पाठविलेल्या शासकीय प्रस्तावात तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असतानासुद्धा मध्यवर्ती ठिकाणी दाखवून अनगर येथे नव्याने अपर तहसील कार्यालय करण्याचा घाट घालणाऱ्या सरकारला जनतेच्या मागणीपुढे नमते घ्यावे लागले आहे. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.30) सायंकाळी भेट घेऊन वस्तुस्थिती विशद केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सदरच्या तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती देऊन फेर सर्वेक्षण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जनतेबरोबरच संघर्ष समितीच्या लढय़ाला यश मिळाले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर या गावात हे कार्यालय मंजूर करण्यासाठी विद्यमान आमदार यशवंत माने यांनी पुढाकार घेतला होता. भौगोलिकदृष्टय़ा अतिशय गैरसोयीचे असतानासुद्धा हे कार्यालय करण्याचा घाट घालण्यात येत होता. मात्र, सर्वच स्तरातून हरकत घेण्यात आलेल्या या कार्यालयाच्या मंजुरीच्या विरोधाराची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली होती. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहर, पेनूर आणि नरखेड गावातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. काही गावांमध्ये याविरोधात ग्रामसभेत ठरावही करण्यात आले. मोहोळ तालुका वकील संघानेही कार्यालयाला विरोध दर्शविल होता. सर्वपक्षीय तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून या कार्यालयाच्या विरोधात लढा उभारण्यात आला होता.
या समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दीपक गायकवाड, भाजपचे विजयराज डोंगरे, संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय क्षीरसागर, सत्यवान देशमुख यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कार्यालयाविषयी सद्यपरिस्थिती सांगितली. त्याचबरोबर कार्यालयात जाण्यायेण्यासाठी दळणवळण व्यवस्था नसल्याने किती गैरसोयीचे आहे, हे वास्तव मांडले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कार्यालयाच्या मंजुरीला तत्काळ तात्पुरती स्थगिती देऊन फेरसर्वेक्षण सादर करण्याचे आदेश दिले.
अनगर येथील अपर तहसील कार्यालय मंजुरीला तूर्तास स्थगिती दिली आहे. हा मोहोळच्या जनतेचा विजय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. अनगर परिसर अजूनही पारतंत्र्यातच जगत आहे. येथील तहसील कार्यालय रद्द झाले नसते तर नरखेड, पेनूर व शेटफळ भागसुद्धा अनगरप्रमाणेच पारतंत्र्यात गेला असता.
– उमेश पाटील, मुख्य प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी अजित पवार गट