अकरावीच्या उपलब्ध जागांची माहिती तातडीने जाहीर करा!

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमांची जागानिहाय माहिती न दिली गेल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी अकरावीच्या उपलब्ध जागांची संपूर्ण माहिती तातडीने जाहीर करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री ऍड. आशीष शेलार यांच्याकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री शेलार यांची आज विधान भवनात भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. या वेळी विद्यार्थ्यांच्या समस्या विस्तृतपणे मांडतानाच त्यांनी मागण्यांचे आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) अधिनियमात दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचनांचे एक निवेदनही शिक्षण मंत्र्यांना सादर केले. त्यात शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब व विलास पोतनीस, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सरचिटणीस अमोल कीर्तिकर, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, सिद्धेश कदम, अंकित प्रभू आदी उपस्थित होते.

मागण्या

  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून 20 पानांच्या उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी 400 रुपयांऐवजी 50 रुपये आणि पुनर्मूल्यांकनासाठी 300 रुपयांऐवजी 50 रुपये असे शुल्क आकारले जावे आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करावी.
  • राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील मूलभूत सुविधांची तपासणी करून उपलब्ध नसलेल्या सुविधा पुरवण्यात याव्यात.
  • विद्यार्थिनींसाठी स्व-संरक्षण कार्यशाळा घेण्यात याव्यात.
  • इंटिग्रेटेड कोचिंगच्या नावाखाली शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण करणार्‍या खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांवर कारवाई करा.

 

अधिनियम दुरुस्तीसाठी केलेल्या सूचना

  • अवास्तव फी वाढीच्या विरोधात पालक वैयक्तिकरीत्या किंवा अधिक संख्येने विभागीय फी नियामक समितीकडे जाऊ शकतात.
  • या समितीत व्यवस्थापन प्रतिनिधी असावा ही तरतूद काढून टाकावी.
  • उशिरा शुल्क भरण्याची तरतूद नको. उशिरा भरलेल्या फीवर शुल्क लावले तर ते प्रतिदिन 50 पैशांपेक्षा जास्त नसावे. त्यावर व्याज नसावे.
  • मागील वर्षाच्या शुल्काइतकेच शुल्क आकारले जावे.
  • शुल्क नियमाचा भंग केल्यास दंडाची तरतूद कायद्यात असावी.
  • फी वाढवण्यासाठी प्रत्येक पालकाची संमती घेतली पाहिजे.