अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार! वचनपूर्ती हेच आमचं हिंदुत्व!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्येतील रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. रामराज्य आणण्यासाठी रामलल्लाचे दर्शन घेतले. असे सांगतानाच रामलल्लांच्या आशीर्वादाने मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल, असा ठाम आत्मविश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करतानाच वचनपूर्ती हेच आमचे हिंदुत्व आहे, असे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी भगवामय झाली होती.

आदित्य ठाकरे यांचे  बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास लखनौ विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळापासून अयोध्येपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले होते. भगव्या पताका आणि भगव्या झेंडय़ांनी परिसर भगवामय झाला होता.

रामनगर येथील इस्कॉन मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्यानंतर हनुमान गढी येथेही त्यांनी दर्शन घेतले. या दौऱयादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अयोध्येच्या पावनभूमीत महाराष्ट्र सदन उभारले जाईल, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. महाराष्ट्रातून हजारो भाविक अयोध्येत दर्शनासाठी येत असतात. त्यांना राहण्यासाठी इथे 100 खोल्यांचे महाराष्ट्र सदन असावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधणार आहेत तसेच पत्रव्यवहारही करणार आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ‘2018 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी पहिल्यांदा अयोध्येमध्ये आलो होतो. तेव्हा त्यांनी ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा दिली होती. त्या घोषणेनंतर राम मंदिरासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेला चालना मिळाली. वर्षभरात नोव्हेंबर 2019 मध्ये न्यायालयाचा निकाल लागला. त्यामुळे आज इथे श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे. त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा संपूर्ण शिवसेनेसह आम्ही अयोध्येत आलो होतो. कोरोनाकाळात आम्हाला येता आले नाही.’

अयोध्येत आम्ही राजकारण करायला नाही तर श्रीरामाचे दर्शन घ्यायला आलो आहोत असे सांगतानाच, ही आमची राजकीय यात्रा नाही तर तीर्थयात्रा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्या ही हिंदुस्थानच्या आस्थेशी जोडलेली पवित्र भूमी आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 70 च्या दशकात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली होती. त्यामुळे इस्कॉन ट्रस्टने मला तिथे बोलावले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शरयू तीरावर महाआरती

आदित्य ठाकरे यांनी सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरतीही केली. त्या महाआरतीमध्ये हजारो शिवसैनिक, युवासैनिक आणि अयोध्येतील नागरिक सहभागी झाले होते. या महाआरतीसाठी शरयूकाठचा परिसर भगवा झाला होता. आरती सुरू करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शरयूची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.

इथला जल्लोष देशाला दिसू द्या, प्रसारमाध्यमांना आवाहन

आदित्य ठाकरे यांच्या दौऱयासाठी अयोध्यानगरी सजली होती. सर्वत्र भगवे झेंडे, भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. मुंबईसह महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक, युवासैनिक ‘जय श्रीराम’चा जयघोष करत अयोध्येत पोहोचले होते. प्रभू रामचंद्रांच्या जयजयकाराने अयोध्या दुमदुमली होती. ‘गेल्या तीन-चार वर्षांच्या काळात शिवसेना परिवारासोबत आम्ही चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. मंदिर निर्माण होत असताना शिवसैनिक इथे रामलल्लांचे दर्शन घ्यायला आले आहेत. हा उत्साह आणि जल्लोष देशाला दिसू द्या!’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले.

प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल

अयोध्या दौरा हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी लक फॅक्टर ठरणार का, या प्रश्नालाही आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण उत्तर दिले. ‘लक हे प्रत्येक ठिकाणी आवश्यक असते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो वा इतर कुठली, प्रत्येक दिवशी आव्हान तर असतेच. चांगले काम करायचे असेल आणि रामलल्लांचे आशीर्वाद असतील तर रामराज्यही आणू शकतो,’ असे सांगतानाच प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा निश्चितच भगवा फडकेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोविड महामारीच्या काळात देशातील सर्व लोकांना महाराष्ट्राने प्राधान्य दिले. त्यामुळेच आमचे आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येत स्वागत झाले. आम्ही रामभक्त म्हणून आस्थेने दर्शनासाठी अयोध्येत आलो आहोत. इथे प्रत्येक हृदयात शिवसेना आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने एकदा वचन दिले की ते पूर्ण करतेच!

शिवसेना पुन्हा हिंदुत्वाच्या अवतारात दिसतेय का, असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना विचारला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘अवतार किंवा राजकारण याबाबत इथे बोलणे योग्य ठरणार नाही. शिवसेनेचे राजकारण आणि हिंदुत्व सर्वांनाच माहीत आहे. आमचे राजकारण सरळ आणि हिंदुत्व स्पष्ट आहे. ‘रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए’ असे आमचे हिंदुत्व आहे. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने, वचने पाळणे हेच आमचे हिंदुत्व आहे. एकदा वचन दिले की मग निवडणूक असो वा नसो, जिंकलो किंवा हरलो तरी ते पूर्ण करतो.’