आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवा पिढीचे प्रेरणास्थान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसैनिक व युवासैनिकांची रीघ लागली. कोरोनामुळे दोन वर्षांनी साजऱया होणाऱया वाढदिवसानिमित्त शिवसैनिक व युवासैनिकांच्या उत्साहाला उधाण आले. मलबार हिल परिसर भगवामय झाला, ‘पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेले कार्यकर्ते तसेच आबालवृद्धांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले व शुभाशीर्वाद दिले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसैनिक व युवासैनिकांचे प्रेम आणि आशीर्वाद स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सकाळपासूनच वर्षा निवासस्थानाबाहेर गर्दी होऊ लागली होती. आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर तरुणाई लोटली होती. प्रवेश मिळताच शिवसैनिकांच्या शिस्तीने रांगेत उभे राहून वर्षा निवासस्थानी व्यासपीठ उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून शुभेच्छा दिल्या जात होत्या. आदित्य ठाकरे यांच्याकडूनही या शुभेच्छांचा स्वीकार करताना मोठय़ा आपुलकीने या कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यात येत होती. पुष्पगुच्छ, केक, फोटोफ्रेम, स्केचेस, शुभेच्छापत्रे याची आपल्या लाडक्या नेत्याला भेट देऊन मोबाईल कॅमेऱयात ही आठवण साठवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता आणि आदित्य ठाकरे यांनीही तितक्याच दिलदारपणे या आपल्या मित्रांसोबत फोटो काढले. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांतून आलेल्या शिवसैनिकांनीही आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचप्रमाणे शिवसेना नेते तसेच पदाधिकाऱयांनीही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विश्वनाथ महाडेश्वर, श्रद्धा जाधव, पालिकेच्या माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, आमदार अजय चौधरी, सदा सरवणकर, संजय पोतनीस, विलास पोतनीस, सुनील राऊत, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, युवासेनेचे अमेय घोले, अमोल कीर्तिकर, पूर्वेश सरनाईक, युवासेनेचे सर्व सिनेट सदस्य यांच्यासह खासदार, आमदार, विभागप्रमुख, नगरसेवक, शिवसेना संलग्न संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनीही अभीष्टचिंतन केले. त्याचप्रमाणे सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या लहान मुलांनीही आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शेतकरी, वारकरी मुलांकडून शुभेच्छा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातून शेतकऱयांची मुले वारकरी वेशात आली होती. त्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ठेका धरत अभंग म्हणण्यास सुरुवात केली. या वेळी आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावरून खाली उतरत कौतुकाने या लहान मुलांना त्यांचे नाव विचारले तसेच अत्यंत प्रेमाने त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.