
‘महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी ‘आम्हाला सत्ता द्या, दररोज पाणी देऊ…’ अशी बरीच भाषणबाजी केली होती. मात्र ओरडून सरकार चालत नाही, कामही करून दाखवावे लागते. शब्द दिला होता, तो पाळलात का? मग लबाड कोण आहे ते सांगा! लबाडांनो, दिलेला शब्द पाळा आणि शहराला दररोज पाणी द्या!’ असा जोरदार हल्ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. जोपर्यंत शहरातील जनतेला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
राज्य सरकारचा बेजबाबदार कारभार आणि बेबंद महापालिका प्रशासनामुळे गेल्या पाच वर्षांपासून शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी शिवसेनेच्या वतीने महिनाभर ‘लबाडांनो, पाणी द्या’ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने शहरभर पाणीजागर करण्यात आला. शुक्रवार, 16 मे रोजी या आंदोलनाचा समारोप ‘हल्लाबोल’ मोर्चाने करण्यात आला. क्रांतीचौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख ज्योती ठाकरे आदी सहभागी झाले होते.
गुलमंडीवर मोर्चाचा समारोप झाला. भाजपला सत्ता द्या, दररोज पाणी देणार… असा शब्द त्यावेळी घसा कोरडा करून फडणवीस यांनी दिला होता. त्यावेळी फडणवीसांनी बरीच शेरोशायरी करत आरडाओरड केली होती. केवळ ओरडून सरकार चालत नाही, तर कामही करून दाखवावे लागते! असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. जर पाणी देता येत नसेल तर शहरात दुष्काळ जाहीर करा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
फडणवीस ‘एसंशि’ आणि दादा यांच्यातील भांडणे मिटवण्यातच मश्गूल झाले आहेत. यातून बाहेर पडा आणि महाराष्ट्रातील जनतेकडेही लक्ष द्या, असा जोरदार टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. कधीतरी जातीधर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाकडे माणूस म्हणून पहा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राखी बांधून घेतली आणि राखरांगोळी केली
राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतो म्हणून भूलथापा दिल्या. त्यांच्याकडून राख्या बांधून घेतल्या. राखी बांधून घेऊन राखरांगोळी करणारे भाऊ कुठे पाहिलेत का? असा संतप्त सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. 2100 रुपये देणार होते, आता 500 रुपयांवर आले आहेत. लाखो लाडक्या बहिणी नावडत्या झाल्या. त्यांची नावे वगळण्यात आली. बहिणींच्या खात्यातून पैसेही काढून घेणार आहेत. काय चालले आहे या राज्यात? महिला सुरक्षित नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहे. कर्जमाफीचा शब्द दिला होता, त्यावरूनही पलटले आहेत. दादा तर म्हणाले, मी असे काही म्हणालोच नाही. राज्यातील जनतेच्या भावनांशी या लोकांनी खेळ मांडल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
कामे अशी करावी लागतात…
महाविकास आघाडीचे सरकार असताना छत्रपती संभाजीनगरात विकासाचा महापूर आला होता. केवळ आरोप-प्रत्यारोप करून विकास मार्गी लागत नाही. कामे करायची आणि ती जनतेला सांगायची. त्यावेळी शहरात सुरु असलेल्या विकासकामांची मी स्वतः रात्री दीड वाजता पाहणी केली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे सोबत होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर नितांत प्रेम होते. पण आता या शहरावर प्रेम करणारेच कुणी राहिले नाही. सगळी साठमारी सत्तेसाठी चालू आहे, अशी खंतही यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली.