राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मिंधे सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा सपाटा लावला. त्यावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. मिंधे आणि भारतीय जनता पक्षाने घेतलेले हे निर्णय म्हणजे अच्छे दिनसारखी पोकळ आश्वासने आहेत. जनतेला ते चांगलेच माहीत आहे.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत ते निर्णय का घेतले नाहीत असा प्रश्न आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांत मिंधे आणि त्यांच्या लुटारू टोळीने फक्त महाराष्ट्र लुटण्याचे काम केले, असाही हल्ला त्यांनी चढवला.