प्रत्येकाने 10 फूट जागा कचरामुक्त केल्यास समस्या कायमची सुटेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विश्वास

992

राज्यातील लोकसंख्या पाहता प्रत्येकाने दहा फूट जरी जागा कचरामुक्त केली तरी कचऱ्याची समस्या कायमची सुटेल, असा विश्वास शिवसेना नेते, पर्यटन, पर्यावरणमंत्री, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचरा कुंडीबाहेर दिसलाच नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई प्लॅस्टिक आणि कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने वरळीच्या ‘एनएससीआय’ येथे आयोजित केलेल्या ‘स्वच्छता पारितोषिक वितरण समारंभ आणि कचरा पुनर्वापर फॅशन शो’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते विविध विभागांत विजेत्या ठरलेल्या सोसायटय़ा, शाळा, आस्थापने, कार्यालये यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, केवळ मुंबईच नाही तर राज्यातील सर्व पालिकांमध्ये कचरामुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालिका आयुक्तांची बैठक घेऊन सूचना दिल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेवक-आमदार रईस शेख, नगरसेवक आशीष चेंबूरकर, सुजाता पाटेकर, हेमांगी वरळीकर, दत्ता नरवणकर, स्नेहल आंबेकर, चंद्रशेखर वायंगणकार, अभिनेत्री दीपाली सय्यद, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, सचिन अहिर, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कचरा पुनर्वापर फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या