हक्काने हाक द्या, शिवसेना मदत करेल! आदित्य ठाकरे यांची बळीराजाला ग्वाही

1228

शेतकरी बांधवांनो घाबरून जाऊ नका. आत्महत्येचा विचार मनात आणू नका. फक्त हाक द्या, तुमच्या हाकेला शिवसेना धावून येईल आणि मदत करेल अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शेतकऱयांना दिली. नाशिक जिह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची सोमवारी आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.

ओझरजवळील मोहाडी गावातील द्राक्षबागांच्या नुकसानीची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. द्राक्षबागांसह अन्य पिकांचे यावर्षी शंभर टक्के नुकसान झाले असून सरसकट संपूर्ण नुकसानभरपाई मिळाली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा व्यथा या शेतकऱयांनी त्यांच्यासमोर मांडल्या. वडनेरभैरव येथेही शेतात जाऊन आदित्य ठाकरे यांनी द्राक्षबागेच्या नुकसानीची पाहणी केली. तेथेच शेती पिकाचे नुकसान होऊन संपूर्ण शेतात चिखल झाल्याने फसलेला ट्रक्टर काढण्यासाठी शेतकऱयांना होत असलेल्या त्रासाची त्यांनी माहिती घेतली. मालेगावच्या दाभाडीत, मनमाड येथे व लासलगावच्या टाकळी येथे त्यांनी मका, कांदा, द्राक्षांसह शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी शिवसेना नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, आमदार किशोर दराडे, मंजुळाबाई गावीत, धुळे-नंदुरबारचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते.

…अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे
अवकाळी पावसाच्या नुकसानीने शेतकरी मोठय़ा संकटात आहे. अशावेळी बँकांनी वसुलीच्या, जप्तीच्या नोटिसा थांबवाव्यात. विमा कंपन्यांनीही तातडीने भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना त्रास दिला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला. याबाबत सर्व आमदारांनाही सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

अपंग शेतकऱ्याला दिलासा
मोहाडी गावातील शेतकरी किशोर जाधव यांना तीन वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने अपंगत्व आले. त्यांच्या सोयाबीनसह अन्य पिकांची अक्षरशः माती झाली. सोयाबीनच्या कुजलेल्या काडय़ा घेऊन ते आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी व्हीलचेअरवरून शेतात आले. आपली व्यथा त्यांनी मांडली. कुटुंबात माझ्याशिवाय इतर कोणीही कमवणारं नसून आता आधार मिळाला नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे जाधव यांनी सांगितले. त्यांच्या पाठीवर हात ठेवत आदित्य ठाकरे यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा दिलासा त्यांना दिला.

आपली प्रतिक्रिया द्या