आगामी निवडणुकीत घमासान होईल, शाब्दिक वार होतील, टीकाटिप्पण्या होतील, आरोप-प्रत्यारोप होतील. पण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणून पुढे जाऊया, युद्ध म्हणून नको, मराठी माणसात फूट पडू नये, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केले.
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या घटना वाढल्या आहेत. वरळी मतदारसंघात एका कार्यक्रमानिमित्त आलेले आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी त्यासंदर्भात विचारले. त्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात फूट पडू नये. मराठी माणसात फूट पडू नये. कुठेही वाद नकोत. येणारी निवडणूक ही निवडणूक आहे. हे युद्ध नाही हे समजून सर्वच कार्यकर्त्यांनी वागले पाहिजे.
कुणीही कोणाचा वैयक्तिक दुश्मन नाही. निवडणुकीत कुणीही वैयक्तिकरीत्या कुणाविरुद्ध नाही तर पक्ष विरुद्ध पक्ष अशी निवडणूक व्हायला हवी. त्यामुळे कुठेही वातावरण गढूळ होऊ नये अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील आणखी एक उद्योग गुजरातला गेल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारवरही निशाणा साधला. तो महाराष्ट्रात रहावा यासाठी मिंधे सरकारने साधे प्रयत्नही केले नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच महायुतीची राजवट अवकाळी सरकार म्हणून डोक्यावर बसलीय ती पुन्हा बसली तर मंत्रालयही गुजरातला नेतील, अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.