आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नगरमध्ये जंगी स्वागत

64

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे कोपरगावात रविवारी  दुपारी युवा प्रतिष्ठान चौकात शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने जंगी  स्वागत करण्यात आले. दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी खंबीर साथ द्या, आशीर्वाद द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसैनिक हा निवडणुकीतच नव्हे तर सतत जनसेवेसाठी कार्यरत असतो. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच शिवसेनेचे कार्य सुरू आहे, यापुढेही ते असेच सुरू राहील असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानण्यासाठी, ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मने जिंकण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद व खंबीर साथ मिळविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे असेही आदित्य यांनी म्हटले.

एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन निघालेली आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा  येवला येथून नगर-मनमाड  महामार्गाने संगमनेर कडे जात असताना  कोपरगाव येथे स्वागत स्वीकारण्यासाठी आदित्य ठाकरे थांबले होते.  जळगावच्या पाचोरा येथून सुरू झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा रविवारी चौथा दिवस होता.  कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने प्लास्टिक मुक्त  खादी ग्राम  उद्योगातून महिलांनी बनविलेले बुके व साई प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे,  जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे  उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव आदीसह   शिवसेना-भाजप युतीचे  पदाधिकारी कार्यकर्ते   आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या