
महाडच्या सावित्री नदीत बस कोसळून 40 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. अशीच एखादी भयंकर दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील 70 पूल तसेच 80 हून अधिक साकवांचे युद्धपातळीवर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य मार्गावरील पुलांचे ऑडिट सार्वजनिक बांधकाम खाते तर गावपाड्यांना जोडणाऱ्या साकव तसेच छोट्या पुलांचे ऑडिट जिल्हा परिषद करणार असून याचा अहवाल दहा दिवसांत सादर केला जाणार आहे.
रायगडात गावे, वाड्यांना जोडणाऱ्या साकवांची संख्या 80 हून अधिक आहे. तसेच बांधकाम विभागाच्या अखत्यारित 70 हून अधिक पूल आहेत. जिल्ह्यातील अनेक पूल 30 वर्षांहून अधिक जुने आहेत. अतिवृष्टीत कमकुवत झालेले पूल कधीही कोसळून सावित्रीसारखी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने संयुक्त मोहीम राबवून पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठक घेतली. धोकादायक पुलांची तत्काळ तपासणी करून दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
साईड पट्टी, रिफ्लेक्टर्स, डायव्हर्शन बोर्ड रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरून घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत अशा सूचना बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले आहे. पुलांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या पुलांची देखभाल दुरुस्ती करायची आहे, त्या पुलांची देखभाल दुरुस्ती पाहणी करून केली जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. ई. सुखदेवे यांनी सांगितले.
पुलांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तयारी सुरू केली आहे. 15 मेपर्यंत अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
– राहुल देवांग, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद