परळीत प्रशासनाचा लागणार कस, महाशिवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान

1021

देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी प्रशासनाला यंदाची महाशिवरात्र चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे. गेले 15 दिवस उलटूनही वैद्यनाथ मंदिराच्या मुख्य मार्गावरच सुरू असलेले सीएए,एनआरसी कायद्याविरोधी आंदोलन आणखी सुरूच आहे. शिवाय येत्या 18 तारखेपासून उच्चमाध्यमिक म्हणजेच 12 वी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे,यामुळे प्रशासनाला या तिन्ही बाबी हाताळतांना शहराची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. आधीच बाजारपेठेत मंदीची लाट असणाऱ्या परळी बाजारपेठेला या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय प्रतिवर्षी वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीसाठी पोलीस प्रशासनातर्फे सुरक्षेसाठी साधारण 175 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येतो मात्र या आंदोलनामुळे अतिरिक्त फौजफाट्याची गरज भासू शकते.

प्रतिवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक परळीत दाखल होत असतात, महाशिवरात्र यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते.मात्र यावेळी शहर पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर वैद्यनाथ मंदिराच्या मार्गावरच सीएए,एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे.  परळीत सुरू असलेल्या आंदोनला प्रशासनीक विभागाची परवानगी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय आंदोलक ज्या जागेवर बसले आहेत त्यातील काही जागा ही वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट ची आहे. 18 फेब्रुवारी पासून उच्चमाध्यमिक परीक्षा, 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती व 21 तारखेला महाशिवरात्र उत्सव असणार आहे. परळीत सुरू असलेल्या नागरिकत्व सुधारणा आंदोलनामुळे प्रशासनाला पुढील काही दिवस डोळ्यात तेल ओतून काम करावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या