कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात सुरु करण्यात आलेल्या शासकीय वाळू डेपोतून अमर्याद वाळू उपसा करण्यात आला असून या वाळू डेपोचे मोजमाप करुन ऑडिट जाहीर करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे कोपरगाव येथील तहसीलदार यांना केली आहे.
निवेदनात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीतून वाळू उपसा करुन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून शासकीय वाळू डेपो तयार करण्यात आले, व तसा ठेका देऊन ठेकेदाराला शासकीय दराने वाळू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. अशाच प्रकारे मागील वर्षी शासकीय वाळू ठेक्यातून यांत्रिक पद्धतीने बेसुमार वाळू उपसा करण्यात आला होता मात्र पाऊस पडण्यापूर्वी व गोदावरी नदीला पाणी सोडण्यापूर्वी सदर वाळू उपाशाचे मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे सदर वाळू उपसा ठेक्यातून चोरी करण्यात आलेल्या वाळूचा अंदाज आला नाही.
या वर्षी देखिल वाळूचा ठेका देण्यात आला असून महसूल व पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने मंजूर ठेक्या पेक्षा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आला आहे त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वी व गोदावरी नदीला पाणी सोडण्यापूर्वी शासकीय वाळू उपसाचे मोजमाप करण्यात येऊन वाळू उपसाचे ऑडिट जाहीर करावे. मंजूर ठेक्यापेक्षा जास्त प्रमाणात वाळू उपसा करण्यात आला असेल तर चोरी गेलेल्या वाळूची रक्कम संबधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी. शासकीय वाळू ठेक्यातून चोरी झाली असे निश्चित झाल्यास संबधित कामावर देखरेख करणाऱ्या महसूल अधिकारी यांच्या वर जबाबदारी निश्चित करुन सदर रक्कम वसूल करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर ॲड. नितीन पोळ, प्रकाश शिंदे, नवनाथ वाघ, मच्छिंद्र वाळुंज यांच्या सह्या आहेत.
वेळेत ऑडिट न केल्यास गोदावरी नदीतून वाळू आणून पदयात्रा काढून ती वाळू महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील घरी नेण्यात येईल असे ॲड. नितीन पोळ म्हणाले.