
>> मंगेश मोरे
भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेडपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. त्याआधीच या मार्गावरील दक्षिण मुंबईतील महत्त्वाची स्थानके जाहिरातदारांच्या घशात घालण्यात आली आहेत. कोट्यवधी रुपयांच्या महसुलासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा स्मारक चौक या प्रमुख स्थानकांच्या नावाआधी जाहिरातदारांचे नाव जोडले आहे. महायुती सरकारने महापुरुषांच्या नावातही तडजोड केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आरे कॉलनीतील शेकडो झाडांची कत्तल करून बांधलेली भुयारी मेट्रो सुरुवातीपासून वादात सापडली आहे. त्यातच आता कमाईसाठी या मेट्रो मार्गावरील स्थानकांच्या नावांत संतापजनक बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या नावाआधी ‘कोटक’ आणि हुतात्मा स्मारक चौक स्थानकाच्या नावाआधी ‘एलआयसी’ जोडले आहे. कोटय़वधीच्या कमाईसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ही स्थानके जाहिरात पंपन्यांना जणू ‘आंदण’ दिली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे जाहिरात कंपनीचे नाव जोडणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. महाराजांना एवढे व्यापारी स्वरूप देऊ नये. हे चुकीचे आहे. अशा प्रकारे नावात बदल करणारा महाराजांपेक्षा मोठा झालाय का? विश्वास पाटील, इतिहासकार
मुंबईत महाराष्ट्र ठेवायचाच नाही यासाठी सर्व बाजूंनी मराठीची गळचेपी केली जातेय. मेट्रोच्या माध्यमातून मराठी ओळख संपवण्याचे कारस्थान आहे. म्हणूनच महापुरुषांच्या नावांचा अपभ्रंश केला जातेय. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. – गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती
जाहिरातदारांना आंदण दिलेली प्रमुख स्थानके
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोटक महिंद्रा बँक
हुतात्मा स्मारक चौक – एलआयसी चर्चगेट – एलआयसी
सिद्धिविनायक – आयसीआयसीआय लोम्बार्ड
विधान भवन – स्टेट बँक ऑफ इंडिया
दादर – स्टेट बँक ऑफ इंडिया