
पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राईकचा अफगाणिस्तानने बदला घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये 48 तासांपासून घनघोर युद्ध सुरू झाले आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करत चौफेर हल्ले सुरू केले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आणि अत्याधुनिक हत्यारांनी हल्ला करत सीमेजवळील 19 चौक्यांवर ताबा मिळवला आहे. एवढेच नाहीतर 55 सैनिकांना ठार केल्याचा आणि एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा तालिबानने केला आहे.
अफगाणिस्तानने गुरुवारी रात्री पाकिस्तानवर जोरदार पलटवार कर तुफान हल्ला चढवला. अफगाणिस्तानच्या सैन्याने नंगरहार-खैबर सीमा आणि कुनार-बाजौर सीमेवर पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला. अफगाणिस्तानी सैन्याने रणगाडे, आर्टिलरी, रॉकेट लाँचर आणि मोर्टारचा मारा केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे 55 सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे.
पाकिस्तानचे ‘ऑपरेशन गझब लिल हक’द्वारे प्रत्युत्तर
दरम्यान, अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्याला पाकिस्तानचे ‘ऑपरेशन गझब लिल हक’द्वारे प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानविरुद्ध थेट युद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने रात्रभर अफगाणिस्तानच्या काबूल, कंदहार, पक्तिया या भागांमध्ये हल्ला केला.
130 हून अधिक ठार झाल्याचा दावा
काबूलमध्ये रात्रभर विमानांचे आवाज, मोठे स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक जखमी झाले. पाकिस्तानने अफगाणिस्तानी सैन्याच्या 27 चौक्या उद्ध्वस्त केल्या, तर 9 चौक्यांवर ताबा मिळवला आहे.
Pakistan’s defence minister says that there is now an ‘open war’ with Afghanistan after latest strikes, reports AP. pic.twitter.com/CoVAoF8pLG
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2026
दावा फेटाळला
अफगाणिस्तानचे 130 हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबान सरकारने फेटाळला. या संघर्षात 8 सैनिक मारले गेल्याचे तालिबान सरकारने म्हटले आहे. तोरखाम सीमा ओलांडून पाकिस्तानमधून परतणाऱ्या निर्वासितांच्या तळावर मॉर्टर शेल पडल्याने 7 निर्वासित जखमी झाले आहेत, ज्यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या सीमेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरू आहेत.



























































