24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्रीपद

उदय जोशी |  बीड  

बीड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला ही ओळख निर्माण झाली होती. हिंदुत्व विचारांचा पक्का पाया हे या मतदार संघाचे वैशिष्ट म्हणूनच सामान्य कुटूंबातील दोन प्राध्यापक बीडचे आमदार होऊ शकले. 24 वर्षानंतर बीड जिल्ह्याला शिवसेनेचे मंत्री लाभत आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये उत्साह संचारला आहे.

या पूर्वी सुरेश नवले यांनी आरोग्य राज्यमंत्री पद सांभाळले होते आता जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेचे मंत्रीपद बीड जिल्ह्याला मिळाले आहे. शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा झाल्यानंतर बीड मध्ये शिवसेनेची पाळे मूळे घट्ट रोवली गेली. गावागावात शिवसैनिक निर्माण झाले, प्रस्थापितांच्या विरोधात रान उठले, सामान्य कुटूंबातील संघर्ष करणारे युवक नेतृत्व करू लागले. 1990 साली प्रा. सुरेश नवले यांना शिवसेनेची उमेदवारी दिली गेली, सुरेश नवले यांनी काँग्रेसला सुरुंग लावत विजय मिळवला. 1995 साली पुन्हा सुरेश नवले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. युतीच्या राज्यात बीड मध्ये शिवसेनेचे पाहिले राज्यमंत्रीपद मिळाले.

पुढे 2004 साली बीड मध्ये  पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला प्रा. सुनील धांडे यांनी राष्ट्रवादीचा पराभव करत विजय मिळवला. पंधरा वर्षे शिवसेनेचा भगवा फडकला, आता पुन्हा एकदा बीड मतदार संघाला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्रिपद मिळत आहे. राष्ट्रवादी सोडून शिवसेने मध्ये दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री होण्याचा मान मिळत आहे.  सुरेश नवले यांना आरोग्य राज्यमंत्री पद दिले होते. क्षीरसागर कॅबिनेट मंत्री होत आहेत. 24 वर्षानंतर बीड मधून शिवसेनेच्या मंत्रीने शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुलले आहे.