अफगाणिस्ताननंतर आता अमेरिका इराकमधून सैन्य माघारी घेणार

अमेरिका आता अफगाणिस्ताननंतर इराकमधूनही सैन्य माघारी घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल काजिमी यांच्यादरम्यान याबाबतचा करार झाला आहे. तब्बल 18 वर्षांनंतर अमेरिकन सैन्य इराकमधून माघारी परतणार आहे. करारानुसार या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकन सैन्य इराक सोडणार आहे.

दरम्यान, इराकी सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी काही अमेरिकन सैन्य इराकमध्ये ठेवले जाणार आहे. अफगाणिस्ताननंतर इराकमधूनही माघार घेतल्याने दोन्ही देशांतील अमेरिकेची लष्करी मोहीम थांबली आहे. बायडन आणि काजिमी यांच्यात पहिल्यांदाच थेट बैठक झाली.

काजिमी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर बायडन म्हणाले, इराकमधील अमेरिकेची लष्करी मोहीम या वर्षाच्या अखेरपर्यंत थांबणार आहे. मात्र, इराकी सैन्याला प्रशिक्षण देणे, इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेला रोखण्यासाठी आवश्यक मदत इराकला करण्याची भूमिका अमेरिकेची असेल.

  • आयएसचा पराभव करण्यासाठी इराकची मदत करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट होते. आता, या भूमिकेत बदल झाला असून, इराकी सैन्याला सल्ला आणि प्रशिक्षण देण्याची भूमिका अमेरिकेची असणार आहे. इराकी सैन्याने देशाचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, अजूनही इराकला आयएसचा धोका असल्याचे बायडन प्रशासनाचे म्हणणे आहे.
  • आयएस आता 2017 इतके ताकदवान राहिलेले नाही. मात्र, दहशतवादी हल्ले करण्यास सक्षम असल्याचे आयएसने दाखवून दिले आहे. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी सद शहरात भर बाजारात आत्मघाती हल्ला केला.
  • ऑक्टोबर महिन्यात इराकमध्ये निवडणुका होणार आहेत. इराकमध्ये आता कोणत्याही परदेशी सैन्याची आवश्यकता नसल्याचे इराकचे पंतप्रधान काजिमी यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी म्हटले होते.
  • सद्दाम हुसैन यांची राजवट उलथवण्यासाठी 18 वर्षांपूर्वी अमेरिका आणि इतर देशांनी इराकमध्ये सैन्य पाठवले होते. इराकमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या आणि युद्धाचा ठपका ठेवत सद्दाम हुसैन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आपली प्रतिक्रिया द्या