मोदींचे मित्र ट्रम्प यांचा हिंदुस्थानला धक्का! गोयल म्हणाले, 10-15 टक्के टॅरिफची चर्चा झाली होती

रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, रशियाकडून तेल व शस्त्रास्त्रे खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला. 1 ऑगस्टपासून नव्या कराची अंमलबजावणी होणार आहे. यावरूनच भाजपच्या केंद्र सरकारवर जोरदार टीका होत आहे.

ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर आज केंद्र सरकारने लोकसभेत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत बोलताना लोकसभेत म्हटलं आहे की, “दोन्ही बाजूंमध्ये द्विपक्षीय बैठकांच्या चार फेऱ्या झाल्या. कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्या. आयातीवर 10 ते 15 टक्के कर लावण्याबाबत चर्चा झाली. द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा झाली. अनेक व्हर्च्युअल बैठकाही झाल्या. आम्ही आमच्या देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करू. राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलू.”

दरम्यान, हिंदुस्थान आणि रशियामधील मजबूत संबंध पाहून ट्रम्प इतके संतापले आहेत की, दोन्ही देशांवर आपला राग व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “हिंदुस्थान रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. रशियासोबत हिंदुस्थान करत असलेल्या व्यवहारांची पर्वा नाही. ते त्यांची मृत अर्थव्यवस्थेसह बुडाले तरी मला पर्वा नाही.”